पुणे

वेल्हे येथे झालेल्या युवक हत्येप्रकरणी आठ अटकेत; सीसीटीव्हीच्या आधारे काढला माग

अमृता चौगुले

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : वेल्हे येथे सोमवारी (दि. 6) जमिनीच्या वादातून विसावा हॉटेलमध्ये पप्पूशेठ ऊर्फ नवनाथ नामदेव रेणुसे (वय 38, रा. पाबे, ता. वेल्हे) याची पिस्तूलने बेछूट गोळीबार व चाकू, सत्तूरने वार करून हत्या केल्याप्रकरणी पाच हल्लेखोरांसह कटात सहभागी असलेल्या तीन महिला अशा आठ जणांना वेल्हे पोलिसांनी बुधवारी अटक केली. न्यायालयाने सर्व आरोपींना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हवेली विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील तपास
करत आहेत.

माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे, (वय 56,रा. पाबे, ता. वेल्हा, सध्या रा. शुक्रवार पेठ, पुणे), आकाश कुमार शेटे, (वय 24, रा. शुक्रवार पेठ, पुणे), यश ऊर्फ प्रथमेश विनायक चित्ते, (वय 22, रा. शुक्रवार पेठ, पुणे), अक्षय गणेश साळुंखे, (वय 27, रा. शुक्रवार पेठ, पुणे), शुभम राजेश थोरात, (वय 21, रा. शुक्रवार पेठ, पुणे, मूळ रा. भालगुडी, ता. मुळशी) व हत्येच्या कटाबाबत आरोपी माऊली रेणुसे यांच्या पत्नी कुंदा ज्ञानेश्वर रेणुसे (वय 45) व मुलगी पल्लवी भूषण येनपुरे (वय 30) व मुलगी गौरी अमोल ऊर्फ शशिकांत शिंदे,(वय 27) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार म्हणाले, मयत नवनाथ रेणुसे हा आरोपी माऊली रेणुसे याच्या जमीन व्यवहारात हस्तक्षेप करत होता. माऊली रेणुसे याच्या मुलाचे एक वर्षापूर्वी निधन झाले. त्याच्या मृत्यूस नवनाथ रेणुसे हा जबाबदार असल्याच्या कारणावरून कट रचून नवनाथ याची आरोपींनी हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा करण्याचा कट तयार करून केलेल्या कटाप्रमाणे सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

होळीच्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी गजबजलेल्या हॉटेलमध्ये निर्घृण हत्येची घटना घडली. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या देखरेखीखाली उप विभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे तातडीने हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

गुन्हे शाखेचे सहायक नेताजी गंधारे, राहुल गावडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, पो. कॉ. मंगेश भगत, अक्षय सुप तसेच वेल्ह्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, पोलिस हवालदार योगेश जाधव, सहायक फौजदार सुरेश कांबळे यांच्या पथकांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला असता खडकवासला किरकटवाडी येथे माऊली रेणुसे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना जेरबंद केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT