पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या योजनेपासून एकही मुलगी वंचित राहणार नाही, याची सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.
या योजनेची जी महाविद्यालये अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट निर्देश विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना दिलेल्या निर्देशानुसार, उच्च शिक्षण घेणार्या मुलींना मोफत शिक्षण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत दिलेल्या निर्देशानुसार शासन व संचालनालयाद्वारे, सहसंचालक कार्यालयाकडून परिपत्रकाद्वारे, ऑनलाइन मीटिंगद्वारे, व्हॉट्सअप ग्रुपवर सूचनांद्वारे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
तरी देखील काही महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था पात्र लाभार्थी विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्या वेळी काही प्रमाणात आणि त्यानंतर देखील शिक्षण शुल्क घेत असल्याबाबतच्या तक्रारी शासन व संचालनालय स्तरावर प्राप्त झाल्या आहेत. संबंधित बाब ही अत्यंत गंभीर असून शासन निर्देशाचे उल्लंघन करणारी आहे.
शासन निर्देशाचे अनुपालन न करणार्या महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थेच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची वेळ येऊ नये याबाबत सर्व प्राचार्य, संचालक, महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे देखील विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सहसंचालक कार्यालयाकडून सर्व संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था यांना अचानक भेटी देऊन प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी शासन धोरण, निर्देशाप्रमाणे सुरू आहे का तसेच महाविद्यालयाच्या स्तरावर स्कॉलरशिप नोडल ऑफिसर नियुक्त केले असल्याची खात्री करण्यात येणार आहे. तसेच निर्देशांचे अनुपालन न करणार्या महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, याची संबंधित संस्थांनी गांभिर्याने नोंद घ्यावी, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.