निमगाव दावडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा आकडा चाळिशीच्या पुढे गेला आहे. त्यामुळे फुलशेतीवर त्याचा परिणाम झाला आहे. सध्या लग्न हंगाम जोरात सुरू आहे. यामध्ये मोगरा फुलांना मोठी मागणी असते. परंतु, वाढत्या तापमानामुळे फुलगळ व फुलांचा आकार वाढण्यास अडथळा निर्माण होत आहे. फुलशेतीस दररोज पाणी द्यावे लागत आहे. ग्रामीण भागात सुवासिक मोगरा फुलांना मोठी मागणी असते. परंतु, तापमान प्रचंड वाढल्याने कळी उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे मोगरा फूल, गजरा तसेच वेणी यांचे भाव कडाडले आहेत.
शेतकऱ्यांनी तोडणी केलेला माल उन्हामुळे सुकत आहे. दुकानदारांना सकाळ, दुपार आणि संध्याकाळ फूल तसेच त्यापासून तयार केलेल्या वेणी, गजरा यावर पाणी मारावे लागत आहे. बाजारात विक्रीस उपलब्ध असलेली नकली फुले, गजरे व वेणी यामुळे खरी फुले संकटात सापडली आहेत. ऐन उन्हाळ्यात फुलांना बाजार नसल्याने फुलशेती धोक्यात आली आहे.