पुणे

धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे; नांदेड येथील शाळा झाली 133 वर्षांची

अमृता चौगुले

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : एकीकडे नांदेडसिटी सारखा आशिया खंडातील अलिशान गृहप्रकल्प, तर दुसरीकडे ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या धोकादायक इमारतीत बसून दुर्घटनेच्या सावटाखाली शिक्षण घेणारे गोरगरीब कष्टकर्‍यांचे शेकडो मुले… हे गंभीर चित्र आहे सिंहगड रोड परिसरातील नांदेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे! या शाळेची इमारत 133 वर्षांची झाली असून सध्या ती धोकादायक झाली आहे. बांधकाम अभियंत्यांनी ही इमारत पाडण्यास मंजुरी देखील दिली आहे.

मात्र, महापालिकेत गावाचा समावेश झाला आणि नवीन इमारत बांधण्याचे काम रेंगाळले. नांदेडचा महापालिकेत समावेश झाला असला, तरी या शाळेचे जिल्हा परिषदेने अद्याप हस्तांतर केले नाही. यावरून जिल्हा परिषद व महापालिकेत कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्याचे काम कागदावरच आहे.

खडकवासला -सिंहगड भागातील सर्वांत जुनी मराठी शाळा म्हणून नांदेड येथील या शाळेची ओळख आहे. 1889 मध्ये शाळेची स्थापना करण्यात आली. चुना मातीत बांधलेल्या शाळेच्या दगडी भिंती उन्मळल्या असून त्यांना तडेही गेले आहेत. तसेच छत्ताचीही दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गाव महापालिकेत गेल्याने शाळेचा निधीही बंद केला आहे. त्यामुळे किरकोळ दुरुस्तीसाठी शिक्षकांना वणवण करावी लागत आहे.

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत चारशेहून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची संख्या कमी आहे. तब्बल चारशे विद्यार्थ्यांना आठच शिक्षक आहेत. शिक्षकांना मतदार नोंदणी, निवडणूक अशा कामांवर नेमले जात आहे. एका वर्गात साठ ते सत्तर विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. या इमारतीत दोन अंगणवाडी सुरू असून त्यातील बालकांची संख्या दीडशेहून अधिक आहे.

शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रुपेश घुले पाटील म्हणाले की, शाळेच्या इमारतीसाठी ग्रामपंचायतीने पंचवीस लाख रुपयांचा निधी राखीव ठेवला. मात्र, निधी पुरेसा नसल्याने प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. तीन मजली इमारत उभारून विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याचा मानस आहे. तसेच डिजिटल अंगणवाडी व प्राथमिक शाळेसाठी ग्रामपंचायतीने आराखडा तयार केला होता. मात्र, महापालिकेत गावाचा समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे निधी तसाच महापालिकेत वर्ग झाला. शाळेचे महापालिकेकडे हस्तांतर नसल्याने महापालिकेने धोकादायक इमारतीकडे दुर्लक्ष केले आहे. तर गाव महापालिकेत गेल्याने जिल्हा परिषद निधी देत नाही.

न्यायालयीन प्रक्रियामुळे हस्तांतर रखडले
हवेली तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांचा महापालिकेत समावेश करण्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शाळा हस्तांतर प्रक्रिया रखडली आहे. गेल्या वर्षीपर्यंत महापालिकेत समावेश केलेल्या शाळा इमारतींच्या दुरुस्तीची कामे केली आहेत. मात्र, चालू शैक्षणिक वर्षात या शाळांना निधी देण्यात आला नाही.

गेल्या पाच वर्षांत महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या नांदेड व इतर गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, तसेच आरोग्य केंद्र अद्यापही महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आली नाही. त्यामुळे शाळा इमारतींचे बांधकाम व दुरुस्तीची कामे करता येत नाही. यामुळे शाळांचे हस्तांतर तातडीने करणे आवश्यक आहे.

                                                   -प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त,
                                                        सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय.

तीन वर्षांपूर्वी प्रशासनाने धोकादायक इमारत असल्याने इमारत पाडण्यास मंजुरीही दिली आहे. मात्र, नवीन इमारत उभारण्याचे काम प्रलंबित आहे. छप्पर कोसळत आहे. भिंतीही ठिसूळ झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने नवीन इमारत बांधण्याची कार्यवाही पूर्ण करणे गरजेचे आहे.
                                                -रमेश बागुल, प्रभारी मुख्याध्यापक,
                                                जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदेड

SCROLL FOR NEXT