Educated most involved in gender-based abortions
पुणे: महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. सर्वात पहिला गर्भलिंगनिदान विरोधी कायदा महाराष्ट्रात करण्यात आला आहे. देशात बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्लीनंतर महाराष्ट्राचा स्त्री भ्रूण हत्येमध्ये क्रमांक लागतो.
गरीब व ग्रामीण भागांपेक्षा सुशिक्षित कुटुंबांमध्ये गर्भलिंग निदानाचे प्रमाण अधिक आहे. सिंगापूर, थायलंडला जाऊन हे गर्भलिंग निदान केले जात असून, त्यानंतर गर्भपात केले जात असल्याचे वास्तव लेक लाडकी अभियान आणि दलित महिला विकास संस्थेच्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी मांडले. (Latest Pune News)
संयुक्त राष्ट्र संघातर्फे अॅड. वर्षा देशपांडे यांना नुकतेच ‘यूएन पॉप्युलेशन’ पुरस्काराने गौरविण्यात आल्यानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे अॅड. देशपांडे यांचा वार्तालाप गुरुवारी आयोजित केला होता. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
अॅड. देशपांडे म्हणाल्या, देशात दरवर्षी सहा लाख तर महाराष्ट्रात तब्बल 53 हजार स्त्री भ्रूण हत्या होतात, ही बाब चिंताजनक आहे. आजवर गरीब किंवा ग्रामीण कुटुंबांमध्ये गर्भलिंग निदान केले जाते असा समज होता. पण, सुशिक्षित आणि उच्च जातींमध्येही गर्भलिंग निदान करण्याचे प्रमाण अधिक आहे. मुलगी नको, याचा कुटुंबांमध्ये राग आहे.
राज्यातील कोल्हापूर, सांगली भागातील ऊसतोडणी पट्ट्यांमध्ये मुलींच्या अस्तित्वाची आमची लढाई सुरू झाली आहे. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरातही जेवढी सुलभ शौचालये नाहीत तेवढी सोनोग्राफी सेंटर आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गर्भलिंग निदान होऊ नये म्हणून देशात विविध कायदे आहेत. मात्र, देशात आजही गर्भलिंग निदान केले जात आहे. जन्मापूर्वी मुलींची हत्या केली जात असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.
शासनाच्या जाहिरातीत दोन मुली का नाही?
शासनाकडूनही आई- वडील आणि एक मुलगा- मुलगी अशी सुखी कुटुंबाची जाहिरात केली जाते. जाहिरातीत दोन मुली का दाखविल्या जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत देशात याबाबत कडक कायदे असतानाही त्याचे पालन का होत नाही? हा प्रश्नही अनुत्तरीतच आहे. कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर मुलीचे नाव ’नकोशी’ ठेवले जात होते. पण आज नकोशी, नाहिशीपासून सुरू झालेला प्रवास हवीशीपर्यंत आणण्यात यश मिळाले आहे. नकोशी म्हणून ठेवलेली नावे कुटुंबांनी बदलल्याचे चित्र आशादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.