पुणे

पुणे : दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाची दरवाढ; शेंगदाणा, मसूरडाळही महागली

अमृता चौगुले

पुणे : सततच्या पावसामुळे लांबलेला हंगाम, डॉलरच्या दरात झालेली विक्रमी वाढ आणि दिवाळीची सुरू झालेली खरेदी यामुळे गेल्या आठवड्यात खाद्यतेल आणि वनस्पती तुपाच्या दरात 15 किलो/लिटरच्या डब्यामागे सुमारे शंभर रुपयांनी वाढ झाली. आवक कमी असल्यामुळे शेंगदाणा तसेच मसूरडाळीच्या दरातही क्विंटलमागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाली. दिवाळीचा सण तोंडावर आला तरी अद्यापही रवा, मैदा, बेसन, गोटा खोबरे, पोहे या जिनसांना अपेक्षित प्रमाणात मागणी नसल्याचे सांगण्यात आले. दसरा दिवाळी या महत्वाच्या सणांचा तोंडावर आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सर्वच खाद्यतेलांचे दर मोठया प्रमाणात गडगडले आहेत.

गेल्या आठवडयात मात्र ही घसरण थांबल्याचे दिसून आले. रुपयाच्या तुलनेने डॉलरचा दर 82 रुपयांपेक्षाही अधिक झाला असून आयाती खाद्यतेलांची पडतळ वाढली आहे. तसेच, खरीपातील तेलबियांचे सततच्या पावसामुळे नुकसान झाले असून हंगामही लांबला आहे. भाव सतत उतरत असल्यामुळे खाद्यतेलांस उठाव नव्हता मात्र दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे गेल्या आठवडयात मागणी वाढली. मात्र वर नमूद केलेल्या कारणांमुळे खाद्यतेलांच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे शंभर रुपयांनी वाढ झाली. तुटवडयामुळे शेंगदाणा तेलाचे दरही 100 रुपयानी वाढले.

खाद्यतेलांमधील दरवाढ आणि वाढती मागणी यामुळे वनस्पती तुपही 75 ते 100 रुपयांनी महागल्याचे सांगण्यात आले. दिवाळीची खरेदी होईपर्यत बाजारात अशीच स्थिती राहील. पाऊस थांबून देशांतर्गत तेलबियांची आवक सुरु झाल्यानंतर हे दर पूर्वपदावर येतील, अशी माहिती चिमणलाल गोविंददास या पेढीचे भागीदार कन्हैयालाल गुजराथी यांनी दिली. मुबलक पुरवठा होत असून अद्यापही अपेक्षित प्रमाणात दिवाळीच्या सणाची मागणी वाढलेली नाही. यामुळे गेल्या आठवडयातही साखरेचे दर स्थिर होते. दिवाळीनिमित्त बाजारात आता पिठी साखरही उपलब्ध आहे. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3625 ते 3650 रुपये होता.

मसूरडाळ महागली, अन्य डाळी स्थिर
आवक कमी असून मागणी वाढल्यामुळे गेल्या आठवडयात मसूरडाळीच्या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली. अन्य डाळीमंधील मंदी थांबली असून आता दर स्थिरावले आहेत. तुरडाळ, हरभराडाळ, मसुरडाळ, मटकीडाळ तसेच उडीदडाळीचे दरात कोणताही बदल आढळला नाही. मटकी, चवळी, वाटाणा बेसन, या जिनसयांचे दरही स्थिर होते. पावसामुळे बाजरीच्या पिकाचे नुकसान झाले असून आवकही लांबणीवर पडली आहे. यामुळे दर तेजीतच आहेत. ज्वारी आणि बाजरीचे दरही 50 ते 100 रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या घाऊक बाजारातील
दर पुढीलप्रमाणे –
साखर (प्रतिक्विंटल) 3625-3650, पिठी साखर 3700-3725 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2750-2900, रिफाईंड तेलः 2500-3250, सरकी तेल 1950-2250, सोयाबीन तेल 1800-2000, पामतेल 1550-1650, सूर्यफूल रिफाईंड तेल 2050-2300, वनस्पती तूप 1525-2000, खोबरेल तेल 2050-2100 रु. डाळी :- तूरडाळ 95000-11000, हरभराडाळ 5600-5800, मूगडाळ 8500-9000, मसूरडाळ 7800-8000, मटकीडाळ 9000-9500, उडीदडाळ 8500-10500 रु. कडधान्ये :- हरभरा 5500-5600, हुलगा- 7200-7500 चवळी 7000-8000, मसूर 7000-7100, मूग 7000-8000, मटकी गावरान 10500-115000, मटकी पॉलिश 7000-7500, मटकी गुजरात 7000-7500, मटकी राजस्थान 7000-7500, मटकी सेलम 13000-13500, वाटाणा हिरवा 5000-6000, वाटाणा पांढरा 6700-6800, काबुली चणा 9000-11500 रु. शेंगदाणा :- जाडा 10500-11000, स्पॅनिश – 11500, घुंगरु 11000, टीजे 10600-10700 रु. धने :- गावरान 12000-13000, इंदूर 14000-17000 रु.

SCROLL FOR NEXT