पुणे

बावडा : उसातील आंतरपिकांपासून आर्थिक आधार

अमृता चौगुले

बावडा; पुढारी वृत्तसेवा : ऊस पिकामध्ये आंतरपिके घेण्याकडे शेतकरीऱवर्गाचा कल कायम आहे. शेतकर्‍यांना या आंतरपिकांपासून मिळणार्‍या उत्पन्नामुळे आर्थिक आधार प्राप्त होत आहे. इंदापूर तालुका उसाचे आगार समजला जातो. उसात मका, गहू, कांदा, हरभरा, मिरची, बटाटा, कोथिंबीर, गवार आदी पिकांची आंतरपिके शेतकरी वर्ग हंगामनिहाय घेतात.

आंतरपिकांपासून ऊस या मुख्य पिकाच्या उत्पन्नावर (टनेज) काहीही परिणाम होत नसल्याची माहिती ऊस उत्पादक अंकुश घाडगे (बावडा), अमरदीप काळकुटे (रेडणी) तसेच निरा- भीमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे (सुरवड) यांनी दिली.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऊस पिकात आंतरपिकांची संशोधनाअंती शिफारस केलेली आहे. ऊस पिकात काही शेतकरी एकाच वेळी एक, दोन किंवा तीन प्रकारची आंतरपिके घेत आहेत. मक्याचे आंतरपीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उसासाठी दिलेली रासायनिक खते, पाणी हे आंतरपिकांना आपोआप मिळते. आंतरमशागतीसाठी वेगळा खर्च येत नाही.

त्यामुळे उसातील आंतरपिकांचा उत्पादन खर्च हा अत्यल्प येतो. परिणामी आंतरपिके शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहेत. आंतरपिकापासून मिळणारा पैसा ऊस पिकासाठी अथवा इतर पिकांसाठी भांडवल म्हणून किंवा घरखर्चासाठी शेतकर्‍यांना उपयोगी पडत आहे, असे निरा-भीमा कारखान्याचे माजी संचालक मोहन गुळवे (भोडणी), पांडुरंग शिर्के (वडापुरी), शिवाजी शिंदे (शेटफळ) यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT