पुणे

घरबसल्या कमवा… स्वप्नातील घर घ्या..! वडगाव शेरी परिसरात अनधिकृत जाहिरातींचे पेव

अमृता चौगुले

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा : वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी, चंदननगर परिसरात भिंती, सार्वजनिक स्वच्छतागृह, पथदिव्यांचे खांब, झाडांवर अनधिकृतपणे जाहिरातबाजी केली जात आहे. यामुळे परिसरातचे विद्रूपीकरण होत आहे. मात्र, नगररोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या जाहिराती लावणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

घर भाड्याने मिळेल, एक रुपया भरून प्लॉट बुक करा, घरबसल्या कमवा, ड्रायव्हिंग स्कूल, लग्न रजिस्टर करून मिळेल, भाडेकरार फक्त पाचशे रुपयांमध्ये, तुमच्या स्वप्नातील फ्लॅट घ्या, स्वस्तामध्ये जीएसटीचे रजिस्टर करा, विविध आजार दूर केले जातील, मोफत दारू सोडवा, डायट न करता वजन घटवा, उंची वाढवा नाहीतर पैसे परत, यासह विविध प्रकारच्या अनधिकृत जाहिरातींच्या पोस्टरचे सध्या परिसरात पेव फुटले आहे.

भिंती, सिग्नल, बसथांबे, झाडे, पथदिवे, रस्ता दुभाजक, सार्वजनिक शौचालय, शासकीय कार्यालये आणि उद्यानांबाहेर विनापरवाना या जाहिरातील लावल्या जात आहेत, त्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होते. महापालिका लाखो रुपये खर्च करून भिंतीवर स्वच्छतेचा संदेश देतात, अशा भिंती या पोस्टरमुळे खराब दिसतात. यामुळे महापालिका विनापरवाना पोस्टर लावणार्‍यांवर कधी कधी कारवाई करते. मात्र, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी, संबंधित व्यक्तींच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायदा 1995 अतंर्गत थेट गुन्हे दाखल केले जात नाहीत, त्यामुळे परिसरात अनधिकृत जाहिराती मोठ्या प्रमाणात लावल्या जात आहेत.

नगररोड- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाने स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत लाखो रुपये खर्च करून भिंती रंगवल्या आहेत. पण, आता या भिंतीवर ठिकठिकाणी पोस्टर, स्टिकर लावलेले आहेत. यामुळे परिसरातील विद्रूपीकरण झाले आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर अधिकारी नाममात्र कारवाई करतात, यामुळे परिसराचे विद्रूपीकरण थांबत नाही.

                                             – शिवाजी वडघुले, रहिवासी, वडगाव शेरी

अनधिकृतपणे जाहिराती लावणार्‍यांवर कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा पोस्टर लावले जातात आणि ते लावणारे सापडत नाहीत. यामुळे आता ज्यांच्या नावाने पोस्टर आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

                                                – नामदेव बजबळकर, प्रभारी सहायक आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT