पुणे

पुणे : ई- टॉयलेट्सचा बट्ट्याबोळ ; देखभाल दुरुस्तीअभावी तीन वर्षांपासून बंद

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ई-टॉयलेटचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. दुरवस्था झाल्याने सर्वच ई-टॉयलेट काही महिन्यांतच बंद झाली आहेत. पाच ठिकाणची ई-टॉयलेट पुन्हा सुरू करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. विशेष म्हणजे, ही ठिकाणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील निवडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीतून जवळपास दोन कोटी रुपये खर्चून जंगली महाराज रस्ता, मॉडेल कॉलनी, भांडारकर रस्त्यावरील हिरवाई गार्डन, गोखले (फर्ग्युसन) रस्ता, सेनापती बापट रस्ता, विठ्ठलवाडी सिंहगड रस्ता, नीलायम ब्रिज, विमाननगर, वाडिया महाविद्यालयाजवळ आणि तळजाई टेकडी, अशा 10 ठिकाणी अत्याधुनिक स्वयंचलित ई-टॉयलेटच्या 21 सीटची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक ई-टॉयलेट आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये, तर उर्वरित शहराच्या इतर भागांतील भाजप नगरसेवक असलेल्या प्रभागांत बसविण्यात आली होती.

या आधुनिक स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापनाचे आणि देखभाल दुरुस्तीचे काम वर्षभरासाठी एका खासगी कंपनीकडे देण्यात आले होते. काही महिने पुरेसे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेमुळे प्रारंभी या स्वच्छतागृहांचा वापर वाढला होता. मात्र, कालांतराने या स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने मागील तीन वर्षांपासून सर्व ई-टॉयलेट बंद आहेत.

परिसरात दुर्गंधी
नागरिकांची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने शहरात सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालये आणि मुतार्‍या बांधण्यात आल्या आहेत. मात्र, वेळच्या वेळी स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात नसल्याने संपूर्ण परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली असते. असेच काहीसे चित्र ई-टॉयलेटच्या परिसरात पाहायला मिळत आहे. टॉयलेटच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ, घाण पसरलेली आहे.

अनेक ठिकाणचे कॉइन बॉक्स गायब
कोट्यवधी रुपये खर्चून जागोजागी उभारलेल्या या ई-टॉयलेटची सुरक्षा मात्र 'राम भरोसे' आहे. अनेक ई-टॉयलेटचे कॉइन बॉक्स फोडून भुरट्या चोरट्यांनी चिल्लर लंपास केल्याचे दिसून आले. हे बॉक्स कटावणीच्या साहाय्याने उचकटण्यात आले आहेत. यासंदर्भात पालिकेच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, या प्रकाराबाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले. चोरट्यांवर वचक बसविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांची गस्त, असे पर्याय शोधणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

पुन्हा पैसा खर्च करण्याचा घाट
तीन ते साडेतीन वर्षांपासून बंद पडलेल्या या टॉयलेटवर पुन्हा पैसा खर्च करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यातील पाच ई-टॉयलेट प्रायोगिक तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. पाच टॉयलेटच्या देखभाल दुरुस्तीसाठी 1 कोटी 10 लाख 72 हजार खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT