पुणे

दिल्ली मॉडेलच्या तोडीस तोड कुदळवाडीमध्ये ई – स्कूल

अमृता चौगुले

चिखली : पुढारी वृत्तसेवा : केवळ उच्चभ्रू लोकवस्तीत असलेल्या शाळाच दर्जेदार शिक्षण देतात या भ—ामक विचारसरणीला मनपाच्या शाळेने चपराक लगावली आहे. कुदळवाडीमध्ये आधुनिक सुविधा असलेले ई-स्कूल याचा प्रत्यय देत असून, 'दिल्ली मॉडेल' शाळांची चर्चा असताना, शहरानेही आता त्या पंक्तीत गरूडझेप घेतली आहे. मनपा शाळा म्हणजे पाट्या टाकण्याचे ठिकाण असल्याचा समज या शाळेला बघितल्यावर दूर होण्यास निश्चित मदत होऊ शकेल.

स्मार्ट सिटी अंतर्गत प्रत्येक वर्गात ई लर्निगसाठी असलेले मॉनिटर, प्रत्येक वर्गात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब या सुविधा पालिकेच्या शाळेतही असू शकतील यावर विश्वास बसणे कठीण आहे, परंतु हे वास्तवात उतरविले गेलेले आहे. शाळा ही बालवाडी ते सातवी वर्गापर्यंत असून शाळेत आजमितीला सुमारे एक हजार विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शहर हद्दीतील कुठल्याही मनपा शाळेने विद्यार्थ्यांना डिजिटल ओळखपत्र दिलेले नाही, परंतु कुदळवाडीच्या या शाळेने त्यातही आघाडी घेत सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचे वाटप नुकतेच केले आहे. सुमारे छत्तीस डिजिटल कॅमेर्‍याने शाळेतील एक न एक घटनेवर नजर ठेवली जाण्याची सुविधा आहे,त्यामुळे कुठल्या वर्गात काय चालले आहे,याचे निरीक्षण करणे शक्य आहे.

शाळेच्या सर्व भिंतींवर समाजसुधारक, क्रांतिवीर आणि थोर संशोधक, शास्त्रज्ञ यांच्या माहितीचे फलक अतिशय सुंदर रीतीने लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे शिक्षण घेताना भिंतीतही सजिवपणा येऊन बोलक्या अशा भिंती जाणवतात. सन 1973 पासून या भागात ही शाळा आहे आणि याआधी तीन खोल्यात वर्ग भरवून शाळेचा गाडा हाकला गेला.परंतु गतवर्षी पालिकेच्या नवीन तीमजली इमारतीत शाळा स्थलांतरित झाली आणि सद्यस्थितीत सुमारे तेवीस वर्गखोल्या असून प्रत्येक वर्गाच्या तीन तुकड्या भरत आहेत.कुदळवाडी भागात युपी,बिहार,नेपाळ,ओडिसा या राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. त्यामुळे शाळेतही त्याच राज्यातील मुलांचा सुमारे नव्वद टक्के भरणा आहे. या शाळेला आधुनिक करण्यात मुख्याध्यापक संपत पोटघन यांचा सिंहाचा वाटा आहे.

शाळेतील सर्व वर्गात ई लर्निग सुविधा असल्याने शाळेतील प्रत्येक विद्यार्थी त्याव्दारे शिक्षण मिळत असल्याने आनंदी आहे. शाळेतील मुलांचे पालक काम, मोलमजुरी यासाठी बहुतेक वेळ बाहेर असल्याने, मुले एकदा शाळेत गेली की त्यांची चिंता मिटते असे शाळेतील शिक्षक मारुती खामकर यांनी सांगितले. शाळेचे क्रीडांगण सुमारे वीस गुंठे जागेत प्रस्तावित असून, अद्याप त्याचे भूसंपादन झाले नसल्याने मुले खेळांना वंचित आहेत. याशिवाय शाळेतील लॅब, हॉलची काही कामे अजून बाकी असून लवकरात लवकर त्याला पूर्ण करण्याबाबत प्रशासन कार्यवाही करेल अशी आशा आहे. इतक्या पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ बारा शिक्षक असून, अपुर्‍या शिक्षक संख्येने अडचणी आहेत याशिवाय इतक्याच अजून शिक्षकांची शाळेला गरज आहे, त्यामुळे त्याचा विचार प्रशासनाने करून शाळेला नवीन शिक्षक नेमावेत अशी पालकांची मागणी आहे.

पीसीएमसी मॉडेल

सरकारी शाळा म्हणजे निव्वळ टाईमपास,या संकल्पनेला मनपाच्या या शाळेने झिटकारले आहे. त्यानिमित्ताने पालिकेने आपले स्वतःचे 'पीसीएमसी मॉडेल' उभे करण्याच्या दिशेने सुरुवात केली आहे, असे जाणवत आहे. शाळेच्या शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी नव्याने भरती प्रक्रिया केली जाणार असून,त्यानंतर ती अडचण दूर होऊ शकेल. क्रीडांगणासाठी आरक्षित जागेचे भूसंपादन होण्याच्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे.पुढील काळात चांगल्या कार्याला कायम प्रशासनिक पाठबळ देण्याबाबत पालिका प्रशासन सकारात्मक भूमिका बजावेल.
                       -संदीप खोत, मनपा उपायुक्त, प्राथमिक शिक्षण विभाग

स्मार्ट सिटी अंतर्गत शाळेला स्मार्ट बनविण्याचा उपक्रम पालिका प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्याचा प्रयत्न आहे.पुढील काळात ई क्लासरूमच्या पुढची पायरी अर्थात 'फ्यूचरिष्टिक क्लासरूम' बनविण्याचा मानस असून समाजातील सगळ्या घटकांच्या सहकार्याने त्यात यश मिळेल अशी आशा आहे.
– संपत पोटघन, प्रभारी मुख्याध्यापक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT