पुणे

एसटीच्या ताफ्यात ई-लालपरी…

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इलेक्ट्रिक शिवाई, इलेक्ट्रिक शिवशाही, इलेक्ट्रिक शिवनेरी, न्यू हिरकणी (सीएनजी), न्यू लालपरी (सीएनजी)नंतर आता एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक लालपरी दाखल होणार आहे. एसटी प्रशासनाने 5 हजार 150 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी 20 बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. जुनी-पुरानी एसटी बससेवा, ही ओळख पुसत एसटी आता कात टाकत आहे.

गेल्या वर्षभरात एसटीच्या ताफ्यात नव्याने विविधरंगी बसगाड्या दाखल होत आहेत. त्यासोबतच शासनाकडून मिळालेल्या सवलतींमुळे एसटीच्या गाड्यांना चांगलीच गर्दी वाढत आहेत. परिणामी, शासनाच्या महसुलातदेखील वाढ होत आहे. आतातर इलेक्ट्रिक लालपरी दाखल झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही नवी ई-लालपरी 35 आसने असणारी मिडी बस वातानुकूलित आहे.

असे आहे बस खरेदीचे नियोजन

मार्च 2023 रोजी एसटी महामंडळाने देशातील सर्वांत मोठे ई-बसचे टेंडर (निविदा) काढले होते. या निविदेअंतर्गत एसटी महामंडळ 5 हजार 150 ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्याअंतर्गत 2 हजार 350 मिडी बसेस व 2 हजार 800 मोठ्या आकाराच्या ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. 20 मिडी बस डिसेंबर महिन्यात एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, टप्प्याटप्प्याने पुढील 2 वर्षांत सर्व 5 हजार 150 ई-बस एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होतील.

तिकीट दर हिरकणी इतका असणार

ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 20 ई-बस ठाणे-नाशिक या मार्गावर चालविण्याचे महामंडळाचे नियोजन असून, या बसचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी बसच्या तिकीट दराइतका निश्चित केला आहे. अर्थात, ई-बसचे तिकीट दर निश्चित करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार यांची एकसदस्यीय समिती राज्य शासनाने नियुक्त केली असून, तिचा अंतिम अहवाल आल्यावर ई-बसचे तिकीट दर ठरणार आहेत, असे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT