जेजुरी : जेजुरीच्या खंडोबादेवाच्या मर्दानी दसऱ्यानिमित्त जेजुरीगडावर आणि मंदिरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. दसरा उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जेजुरीच्या खंडोबादेवाचा दसरा हा मर्दानी दसरा म्हणून प्रसिद्ध आहे. घटस्थापनेला खंडोबा आणि म्हाळसादेवीचे घट बसविण्यात आले. नित्यपूजा, घडशी समाजाचा सुमंगल सोलोवादनात जागर, राज्यातील वाघ्या-मुरुळी व लोककलावंतांच्या भक्तिगीतांनी वातावरण खंडोबामय झाले आहे.
दुसऱ्या दिवशी देवाचे घट उठवून जेजुरी गडाचे पूजन, मानकरीवर्गाचे ध्वजपूजन, शस्त्रास्त्रपूजन होऊन सायंकाळी ६ वाजता खंडोबादेवाचा पालखी सोहळा निघून पिवळ्या जर्द भंडाराची उधळण व 'येळकोट-येळकोट जय मल्हार'चा जयघोष होऊन सोहळा सीमोल्लंघनासाठी मार्गस्थ होणार आहे. गडप्रदक्षिणेनंतर पालखी सोहळा देवभेटीसाठी रमणा डोंगरात विसावणार आहे, तसेच कडेपठार मंदिरातून वाजतगाजत देवाचा जागर करीत पालखी सोहळा रमण्यात येऊन पहाटे २ ते २.३० वाजेच्या सुमारास देवभेटीचा विलोभनीय सोहळा रंगणार आहे.
या वेळी जेजुरी देवसंस्थान, भाविक व मानकरी यांच्या वतीने हवाई फटक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. देवभेटीनंतर आपटापूजन होऊन पालखी सोहळा गावातून मिरवून पहाटे जेजुरी गडावर पोहचेल. सकाळी ७ वाजता सरदार पानसे यांनी अर्पण केलेल्या तलवारीची कसरत आणि तलवार तोलून धरण्याच्या ऐतिहासिक स्पर्धा होणार आहेत. या वेळी नित्य सेवेकरी, मानकरी, पालखी सोहळ्याचे खांदेकरी, वाघ्या-मुरुळी, लोककलावंत यांचा सन्मान देवसंस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे.