पुणे

आकुर्डी : उन्हाळी सुट्यांत बालचमू उडवतोय धमाल !

अमृता चौगुले

आकुर्डी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शाळांना उन्हाळी सुटी लागल्याने म्हाळसाकांत चौक परिसरातील महापालिकेच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात नागरिकांची गर्दी होत असून, बालचमूंची धमाल- मस्ती पहावयास मिळत आहे. लपाछपी, रुमाल-पाणी, मामाचं पत्र हरवलं, आंधळी कोशिंबीर खेळ खेळण्यात बालचमू दंग होत आहेत. मुलांच्या उन्हाळी सुट्या त्यातच जोडून आलेला शनिवार, रविवारमुळे कुटुंबीयांनी मुलांसमवेत उद्यानात गर्दी केली होती. उद्यानात वेगवेगळी उन्हाळी शिबिरेदेखील सुरू असल्याचे दिसून आले. या शिबिरांतही बालचमूंचा उत्साही सहभाग असल्याचे दिसून येत आहे. उद्यानाच्या बाहेरही व्यावसायिकांनी खेळणी, खाद्यपदार्थ व आइसक्रीमची दुकाने थाटली आहेत.

चित्रकला, डॉन्स स्पर्धा, विविध कलाकृती, उपक्रम

उन्हाळी शिबिरामध्ये मुलांना विविध माध्यमांतून त्यांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी यामध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या पर्यावरणाला होणार्‍या हानीपासून वाचविण्यासाठी रंगीत कागदी पिशवी तयार करून त्याचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, डॉन्स स्पर्धा, ज्युदो कराटे, विविध खेळ खेळून उपक्रमात बालचमू सहभागी झाल्याचे दिसून आले.

फोटो, सेल्फी काढण्यात तरुणाई दंग

या उद्यानात तरुणाई फोटो, सेल्फी काढताना दंग असल्याचे पहावयास मिळाले. इन्स्टाग्राम, फेसबुकवर रिल्स अपलोड करून ते आदी सोशल मीडियावर टाकत असून, उद्यानातील फोटो पाहून शहारातीलच नव्हे, तर बाहेरगावाहून आलेले नागरिकदेखील उद्यानात येत फेरफटका मारण्यास विसरत नाहीत.

विविध वेशभूषा करून विद्यार्थिनींचे भरतनाट्यम्

उद्यानातील एका भागात काही महाविद्यालयीन तरुणी भरतनाट्यमचा सराव करताना आढळून आल्या. बंदिस्त हॉलऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात भरतनाट्यमचा सराव करण्यामुळे आम्हांला उत्साही वाटते; तसेच आरोग्याच्या दृष्टीने हिरव्या गवतावर नृत्याचा सराव केल्यास त्याचा मोठा लाभ मिळत असल्याचे या विद्यार्थिनींनी सांगितले. आम्ही भरतनाट्यमच नाही, तर कथक, फोक डान्स, हिपहॉप, फ—ी स्टाईल, लावणी, कुचीपुडी तसेच गरबा हे नृत्य प्रकार शिकत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे वेगवेगळ्या वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थिनींनी भारतीय तसेच पाश्चात्य शैलीत भरतनाट्यम केले. संपूर्ण समर व्हेकेशनला याच उद्यानात सराव करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यायाम करणार्‍यांची संख्या वाढली

बारा एकर जागेमध्ये हे उद्यान व्यापले आहे. येथे मनमोहक झाडे, फुले, वेलींनी बहरलेले हिरवळीचे मैदान, प्लास्टिकपासून बनविलेले वस्तू तसेच फ्लावर बेड, प्रवेशद्वार, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, खेळाचे साहित्य सामग्री, कारंजी, मुलांसाठी खेळण्यासाठी हिरवेगार मैदान, स्वच्छतागृह आदी सुविधा असल्याने तसेच शुद्ध हवा, ऑक्सिजन मिळत असल्याने पहाटेच्या सुमारास नियमित व शारीरिक व्यायामासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढताना दिसून आली.

या उद्यानात उन्हाळी सुट्या लागल्यामुळे मुलेही शारीरिक कसरत तसेच व्यायाम करताना दिसून येत आहेत. उद्यानाच्या बाजूलाच दर शनिवारी आठवडे बाजार भरत असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. तसेच व्यावसायिकांनाही होत आहे.

आम्ही नियमित व्यायामासाठी उद्यानात येतो. उद्यानात विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. शुद्ध हवा घेण्यासाठीही आम्ही नियमित येत असतो.

                         – नितीन कापरे, सुरेश माळी, अमोल नवले

काही नागरिक कौटुंबिक सहल किंवा फेरफटका मारण्यासाठी येतात, तसेच बहरलेली झाडे, पाने, फुले वेगवेगळ्या वनस्पती पाहण्यासाठी येतात.

                                 – आबा तावरे, उद्यान कॉन्ट्रॅक्टर

नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्मार्ट उद्यान होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी उद्यानात प्लास्टिकचा वापर शक्यतो करू नये.

                                – गोरख गोसावी, उद्यान अधीक्षक

SCROLL FOR NEXT