राजगुरुनगर: रविवारी (दि.13) सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारांचा फटका खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील रानमेव्याला बसला. आंबा, मोहाची फुले, जांभूळ, करवंद, रान आवळ्याच्या कोवळ्या फळांना याचा फटका बसला. त्यामुळे रानमेव्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आदिवासी बांधवांच्या रोजगारावर होणार आहे.
महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे गावरान रानमेव्याला अनुकूल वातावरण असताना रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील रानमेव्याचे नुकसान झाले.
खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासींचे रानमेवा हा रोजगाराचे मुख्य साधन आहे. रानमेव्यामुळे डोंगरदर्यांत वास्तव्य करणार्या आदिवासींना आर्थिक हातभार मिळतो. उन्हाळ्यात येणारा गावरान आंबा, करवंद, जांभुळ, गावठी आवळ्याच्या विक्रीतून प्रपंच भागवून येणार्या हंगामाच्या तयारीसाठी दोन पैशांचे नियोजन केले जाते. मात्र, अवकाळी पावसामुळे यंदा हक्काच्या उत्पन्नावरच गदा येण्याची चिन्हे आहेत.
जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यात गावरान आंब्याच्या जातीसह जांभूळ, करवंद व गावठी आवळा यांची झाडे आहेत. यंदा अनुकूल वातावरणामुळे चांगले उत्पादन येण्याची चिन्हे होती. परंतु, अवकाळीमुळे त्यात घट होण्याची शक्यता आहे.