पुणे

पुणे : ‘माननीयां’साठी रिंगरोडने मारला ‘टर्न’

अमृता चौगुले

दिगंबर दराडे :

पुणे : राजकीय आणि बिल्डरांच्या दबावापोटी रिंगरोडच्या अलाइनमेंटमध्ये काही ठिकाणी बदल करण्यात आला आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींची व्यावसायिक जागा आणि बिल्डरांच्या जागेचा फ्रंट वाचविण्यात आला आहे. माननीयांसाठी रिंगरोडमध्ये कट मारला असून, या प्रकरणात  'तेरी भी चुप मेरी भी चुप' झाल्याचा प्रकार दै. 'पुढारी'ने समोर आणला आहे.

रिंगरोडचे काम करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार युद्धपातळीवर रिंगरोडचे काम सुरू आहे. जागेचे अलाइनमेंट करीत असताना अनेक गावांतून तक्रारींचा पाऊस पडत होता. धार्मिक ठिकाणापासून देखील रोड वाचविण्यासाठी गावकर्‍यांनी मागणी केली होती. या मागणीला प्रशासनाने न्याय दिला आहे. त्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे. मात्र, माननीयांसाठी राज्य सरकारने थोडी नम्रता दाखविल्याची चर्चादेखील सर्वत्र रंगली आहे. चार वर्षांंत हा रिंगरोड पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता शासनाने तेवीस हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे.

पूल, बोगदे वळविले…

भविष्यात रिंगरोडच्या जागेला मोठे दर प्राप्त होणार आहेत. हे ओळखून माननीयांनी अनेक क्लृप्त्या शोधल्या आहेत. रिंगरोडला आपणास अधिकचा फ्रंट मिळेल, याकरिता काळजी घेतलेली दिसून येत आहे. याचबरोबर आपल्या जागेभोवती येणारे पूल, बोगदे दुसरीकडून वळविण्यात ते 'यशस्वी' झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एनएचआयकडून हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे. वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील पुण्याच्या रिंगरोडकरिता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पाने वेग घेतला आहे.

आजच्या बजेटमध्ये तरतुदीची अपेक्षा
राज्याच्या बजेटमध्ये रिंगरोडकरिता तुटपुंजी तरतूद करण्यात आलेली होती. हा रिंगरोड अनेक वर्षे रखडल्याने त्याचे बजेट आठ हजार कोटींवरून आता तब्बल तेवीस हजार कोंटीच्यावर गेले आहे. यासाठी एनएचआयने रिंगरोड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय बजेटमध्ये या प्रकल्पाकरिता आणखी तरतूद होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

तेरी भी चुप मेरी भी..
एरवी विकासकामांसाठी एकमेकांशी भांडणार्‍या माननीयांंनी मात्र रिंगरोडसाठी एकीची रिंग केली असून, 'तेरी भी चुप मेरी भी चुप' म्हणत विकसकांना हाताशी धरून आपले हित साधून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे रिंगरोडबाबत कुठलेही माननीय भांडताना दिसत नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT