पुणे

पुणे : ओतूर परिसरात उन्हाचा जोरदार चटका

अमृता चौगुले

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : उत्तर पुणे जिल्ह्यातील आणे माळशेज पट्ट्यात सर्वच गावांमधून कडक उन्हाचा प्रचंड प्रमाणात चटका बसत असल्याने दैनंदिन कार्यक्षमतेलाही मोठा फटका बसत आहे. उन्हाच्या काहिलीने भूगर्भातील पाणीपातळीत वेगाने घट होत आहे. शेतात काम करणे अत्यंत जिकिरीचे होऊन बसले आहे. उन्हाच्या तडाख्याने नागरिक दिवसभर घरात बसणे पसंत करीत आहेत. तीव्र ऊन व अत्यंत उष्ण हवामानामुळे ओतूरच्या बाजारपेठेतही प्रचंड शुकशुकाट पसरल्याने अर्थकारण आपसूकच पूर्णपणे कोलमडले आहे.

एप्रिल महिन्याच्या दुसर्‍याच आठवड्यात सूर्यदेवता प्रचंड प्रमाणात आग ओकत असल्याने कडक उन्हातही मजुरांना काम करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही; परिणामी विविध उष्णतेसंबंधीचे आजार बळावण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी, अहिनवेवाडी, ठिकेकरवाडी, धोलवड, हिवरे खुर्द, डुंबरवाडी, धोलवड, डिंगोरे, उदापूर, खामुंडी, पिंपरी पेंढार या परिसरात तापमानात अचानक झालेली वाढ, उन्हाच्या तीव्र झळा सहन होण्यापलीकडच्या आहेत. सद्य:स्थितीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कडक उन्हाचा चटका बसत आहे.

स्वसंरक्षणासाठी अंग झाकण्यासाठी शर्ट, पायजमा, टोपी, उपरणे, रुमाल, ओढणी, स्कार्फ, गॉगल, छत्री आदींचा वापर नागरिक करू लागले आहेत. उन्हाची काहिली कमी झाली नाही, तर उष्णतेचे बळी जाण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT