पुणे

दिव्यांगांच्या रॅम्पमुळे सोय कमी अन् गैरसोयच जास्त

अमृता चौगुले

शंकर कवडे : 

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  न्यायालयात आलेल्या दिव्यांगांना सुरक्षितपणे चालता-उतरता यावे यासाठी रॅम्प उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, दिव्यांगांसाठीचे हे रॅम्प सध्या न्यायालय कक्षाबाहेरील ये-जा करण्याच्या मार्गावर धूळ खात पडले आहेत. त्यामुळे, कक्षाबाहेरील जागा अरुंद झाली असून, येथून ये-जा करणार्‍या नागरिकांसह वकीलवर्गाला अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी दररोज हजारो लोकांची ये-जा असते. यामध्ये, दिव्यांगांचाही समावेश असतो. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामध्ये, साक्षीदाराच्या पिंजर्‍यापर्यंत जाण्यासाठी लाकडी रॅम्पची सुविधा होती. काही दिवस न्यायालयाच्या कक्षात हे रॅम्प ठेवण्यात आले होते. मात्र, सध्या ते दिवाणी न्यायालयासह जुन्या तसेच नव्या इमारतीतील न्यायालयांच्या कक्षाबाहेर दिसू लागले आहेत. त्यांपैकी बरेचसे रॅम्प मोडकळीस
आले आहेत. न्यायालय कक्षाच्या ये-जा करण्याच्या मार्गावर ते ठेवण्यात आल्याने न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांसह वकील वर्गाला त्याचा सामना करावा लागत आहे.

दिवाणीसह नवीन इमारतीतील न्यायालय कक्षाबाहेर रॅम्प धूळ खात पडले असून, त्यापैकी काही मोडकळीस आले आहेत. न्यायालयाच्या कक्षाबाहेर ते ठेवण्यात आल्याने वकील तसेच पक्षकारांना चालण्यासाठीची जागा अरुंद झाली आहे. एका विशिष्ट ठिकाणी रॅम्प ठेवून अतिरिक्त रॅम्प हलविण्याची आवश्यकता आहे.
                       – अ‍ॅड. आकाश मुसळे, माजी सदस्य, पुणे बार असोसिएशन.

कक्षाबाहेर ठेवण्यात आलेल्या रॅम्पमुळे पॅसेज अरुंद झाला आहे. येथील सर्व रॅम्प योग्य त्या ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून या ठिकाणाहून ये-जा करणार्‍या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. न्यायालयीन कामकाजासाठी येणार्‍यांची या अडचणीतून त्वरित सुटका करण्याची आवश्यकता आहे.
                         – अ‍ॅड. आनंद धोत्रे, माजी सदस्य, पुणे बार असोसिएशन.

SCROLL FOR NEXT