यंदाची वार्षिक परीक्षा राज्यात एकाचवेळी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. File Photo
पुणे

शाळांच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर; शिक्षक व पालकांचा संताप

परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बारामती: राज्यभरातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षेसाठी शिक्षण विभागाने वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, यावर्षीच्या परीक्षा 25 एप्रिलपर्यंत असणार आहेत. त्यामुळे पालक व शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षांमध्ये एकवाक्यता राहवी तसेच एप्रिलमध्ये मुलांची उपस्थिती राहण्यासाठी वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. एप्रिल अखेरपर्यंत या परीक्षा सुरू राहणार असल्याने या वेळापत्रकावर पालक व शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपत असतात. 15 एप्रिलपर्यंत परीक्षांचे कामकाज पूर्ण होऊन पुढील पंधरवड्यात वार्षिक निकालपत्रिक तयार करून 1 मे रोजी निकाल जाहीर केला जातो. मात्र, या वर्षी उशिरा होणार्‍या परीक्षेमुळे शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

वार्षिक परीक्षेसोबतच, संकलित मूल्यमापन 2, पॅट चाचणीचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत. ही परीक्षा तिसरी ते नववीच्या वर्गांसाठी आहे. पॅट परीक्षा मराठी, इंग्रजी व गणित या विषयांसाठी घेतली जाते. त्याचबरोबर पाचवी ते आठवीच्या मुलांसाठी वार्षिक परीक्षा घेण्यात आली आहे.

शिक्षण आयुक्तालयाच्या परिपत्रकातील वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पाडल्यास शेवटचा पेपर 25 एप्रिल रोजी आहे. त्यानंतर निकालापर्यंत फक्त चार ते पाच दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे. जास्त विद्यार्थिसंख्या असणार्‍या शाळांमध्ये निकालाच्या कामासाठी खूप कमी कालावधी मिळत आहे. अशा परिस्थितीत 1 मे रोजी निकाल कसा जाहीर करणार, असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे.

ऐन उन्हाळ्यात मुलांचे हाल15 एप्रिलनंतरचा प्रचंड उकाडा, बाहेरगावी जाणारे पालक, ग्रामीण भागातील यात्रांचा हंगाम यांमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठभ शिक्षकांची धावाधाव होणार आहे. यंदा उन्हाची तीव्रताही अधिक आहे. त्यामुळे अनेक मुले उष्णतेमुळे आजारी पडण्याच्या भीतीने पालकांनी या वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे.

परीक्षेनंतर शिक्षकांची कामे

वार्षिक परीक्षेनंतर शिक्षकांना पेपर तपासणी, संकलित मूल्यमापन नोंदवही पूर्ण करणे, पॅट परीक्षेचे गुण ऑनलाइन चॅटबोटवर भरणे, निकाल पत्रकांना मंजुरी घेणे, यांसारखी कामे करावी लागतात. ती कधी करायची, असा सवाल शिक्षक उपस्थित करत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ देण्याऐवजी त्यांना महिनाभर प्रशिक्षण दिले गेले. आता ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात विद्यार्थी-शिक्षकांना नियमित शिक्षणासाठी आग्रह करणे अजब आहे.
- बाळासाहेब मारणे, राज्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT