पुणे

मान्सूनमुळे ‘आरोग्य’ला सतर्कतेचे आदेश

संकेत लिमकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मान्सूनच्या आगमनामुळे उन्हाळ्याच्या त्रासातून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाळ्यात जलजन्य आणि कीटकजन्य आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे उपाययोजनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवविण्यात आले आहे.

राज्यातील विविध भागांत पावसाचे प्रमाण आणि तीव्रता यामुळे काही भागांत पाणीटंचाई, तर काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मलेरिया, विदर्भात जपानी एनसिफेलायटिस, लेप्टोस्पायरोसिस, कोकण आणि पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईसारख्या महानगरांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, असा अंदाज आरोग्य विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.

आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर म्हणाले, 'जलजन्य व कीटकजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागांचा समावेश असलेल्या सर्व जिल्ह्यांना मान्सूनच्या तयारीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याला मनुष्यबळ आणि संसाधनांचे योग्य नियोजन करून साथीचे रोग रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी त्यांच्या असुरक्षित गावांची यादी तयार करण्यास सांगितले आहे.'

प्रत्येक जिल्ह्यात आश्रमशाळा, विद्यार्थी वसतिगृहे, वृद्धाश्रम अशा संस्था आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचार्‍यांना या संस्थांना नियमित भेट देण्यास सांगण्यात आले आहे. जलजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी परिसरातील जलस्रोतांचे प्रभावी गुणवत्ता नियंत्रण करण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. दरवर्षी पावसाळापूर्वी सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार प्रत्येक गावाला हिरवे, पिवळे आणि लाल कार्ड दिले जाते. यंदाही गावांचे काळजीपूर्वक सर्वेक्षण केले जाईल.

– डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य सेवा

हेही वाचा

SCROLL FOR NEXT