पुणे

जुन्नरला पावसाची हुलकावणीच ! पाण्याअभावी सोयाबीन पडलं पिवळं

अमृता चौगुले

लेण्याद्री : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील इतर ठिकाणांसह जुन्नर तालुक्यालाही पावसाने यंदा हुलकावणी दिली आहे. तालुक्यात सोयाबीन हे महत्त्वाचे नगदी पीक असून, 15 हजार हेक्टरवर पेरणी होत असते. मात्र, ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे पूर्व भागातील सोयाबीन सुकू लागले आहे. पाण्याचा इतर कोणताही स्रोत नसल्याने अनेक भागात हे पीक पावसाच्या भरवशावर घेतले जाते. तुलनेने या पिकाला कमी देखभाल, कमी औषधे आणि मर्यादित पाणी लागते. सोयाबीनची पेरणी साधारण जूनअखेर केली जाते, जेणेकरून दिवाळीपर्यंत सोयाबीन बाजारात विकता येते, अशी माहिती शेतीतज्ज्ञ संदीप नवले यांनी दिली. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर मात्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, तालुक्याच्या पश्चिम भागातही मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड होते. मात्र, पूर्व भागाच्या तुलनेत या भागात पाण्याची परिस्थिती बरी आहे. धरणे, विहिरी, कूपनलिका, केटी बंधारे आदी स्रोतांतून सोयाबीन जगवला जात आहे. सध्या सोयाबीनमध्ये शेंगा भरण्याची स्थिती आहे. काही ठिकाणी सोयाबीन फुलोर्‍यात आहे. त्यामुळे आता पिकाला पाण्याची गरज आहे. या वर्षी सोयाबीनचे बाजार 50-55 प्रतिकिलोपर्यंत गेले होते. यंदा कमी पावसामुळे मालाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवक कमी झाल्यास सोयाबीनमध्ये तेजी येण्याची शक्यता व्यापारी स्वप्निल परदेशी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT