पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागात कार्यरत असलेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी (सह जिल्हा निबंधक वर्ग-1) या पदावर महसूल विभागातील अधिकारी आर्थिक देवाण करून प्रतिनियुक्तीवर आले. त्यामुळे या विभागात कार्यरत असलेले सहजिल्हा निबंधक वर्ग-2 च्या अधिकार्यांना गेल्या काही वर्षांपासून 'पदोन्नती' मिळाली नाही. याबाबत पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकार्यांनी तीव— नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिका-यांच्या विरोधात एल्गार पुकारणार आहोत, असा दावा राज्यातील अधिकार्यांनी केला आहे.
राज्यातील मुद्रांक आणि नोंदणी विभाग हा राज्यातील जीएसटीनंतर राज्य शासनास सर्वात अधिक महसूल देणारा विभाग आहे. राज्यात तालुकास्तरासह (सबरजिस्ट्रार) 540 कार्यालये कार्यरत आहेत. तर राज्यात 54 सहजिल्हा निबंधक (वर्ग-1) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आहेत. त्यापैकी 37 जिल्हा निबंधक हे विभागातीलच असून, ते नियमानुसार राज्यात विविध जिल्ह्यांत कार्यरत आहेत. तर अजून 17 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 7 पदांवर महसूल विभागातील अधिकारी प्रतिनियुक्तीवर आले असून, त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आतील हाताने 'आर्थिक देवाणरघेवाण' केली आहे, असा आरोप पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहजिल्हा निबंधक (वर्ग -2) यांनी केला आहे. त्यामुळे आमची पदोन्नती रखडली आहे, असाही दावा त्यांनी केला आहे.
प्रतिनियुक्तीने आलेल्या अधिकार्यांनी मुंबई, अंधेरी, बोरिवली, कुर्ला, कोल्हापूर, अंमलबजावणी क्रमांक-1 आणि 2 या विभागांतील पदांवर कब्जा केला आहे. तर गडचिरोली, गोंदिया, वाशीम, नगर, सांगली, पुणे ग्रामीण, मुद्रांक व नोंदणी मुख्य कार्यालय क्रमा़ंक-13 आणि क्रमांक-7 या पदांवर गेल्या काही वर्षांपासून पदोन्नतीने एकाही अधिकार्याची नियुक्ती केली गेलेली नाही. ही पदे अजूनही रिक्त असून, तात्पुरता कार्यभार काही अधिकार्यांवर सोपविण्यात आला आहे. प्रतिनियुक्तीवर महसूल विभागातून आलेल्या अधिकार्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवावे आणि पदोन्नती रखडलेल्या वर्ग-2 च्या अधिकार्यांना तत्काळ पदोन्नती द्यावी, यासाठी संबधित अधिकारी लवकरच एल्गार पुकारणार आहेत.
आतापर्यंत केवळ चारच वर्ग-2 च्या अधिकार्यांना पदोन्नती मिळाली आहे. राज्यात सहजिल्हा निबंधक (वर्ग -1) ची 17 पदे रिक्त आहेत. त्यापैकी सात पदांवर प्रतिनियुक्तीने महसूल विभागातील आलेल्या अधिका-यांनी कब्जा केला आहे. तर केवळ चारच वर्ग-2 च्या अधिकार्यांना पदोन्नती दिली आहे. अजून किमान 10 हून अधिक अधिका-यांची पदोन्नती रखडली आहे. त्यांना लवकरात लवकर पदोन्नती मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा