शेवगा 50 रुपये किलोवर; तीन महिन्यांत किलोमागे 500 रुपयांची घसरण File Photo
पुणे

शेवगा 50 रुपये किलोवर; तीन महिन्यांत किलोमागे 500 रुपयांची घसरण

दर उतरल्याने गृहिणींना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: तापमानातील उष्मा वाढू लागताच शहरातील बाजारपेठांमध्ये शेवग्याची आवक वाढू लागली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने घाऊक बाजारात शेवग्याचे भाव 10 ते 30 रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर, किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याची 40 ते 50 रुपयांना विक्री सुरू आहे. डिसेंबर महिन्यात आवक घटल्याने किरकोळ बाजारात 600 किलोपर्यंत गेलेला शेवगा तीन महिन्यांनंतर 50 रुपयांपर्यंत आल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात शेवग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तर, राज्यात पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर भागात शेवग्याची लागवड होते. दक्षिणेकडील राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेवग्याच्या लागवडीला फटका बसला होता. परिणामी, डिसेंबर महिन्यात किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये किलो असे भाव मिळाले होते. मात्र, सध्या उष्मा वाढल्याने शेतकर्‍यांनी शेवग्याची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात स्थानिक भागातील शेवग्याची एक हजार ते 1500 डाग (पिशवी) अशी आवक होत आहे. एका पिशवीत साधारणपणे 30 किलो शेवगा असतो. शेवग्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असली तरी मागणी बेताची आहे. परिणामी, घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याला प्रतवारीनुसार 100 ते 200 रुपये असे दर मिळाले असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील शेवगा व्यापारी रामदास काटकर यांनी दिली.

यंदा थंडीत शेवग्याला उच्चांकी दर मिळाले होते. उच्चांकी दर मिळाल्यानंतर शेवग्याच्या लागवडीतही वाढ झाली. शेवगा उष्ण असल्याने उन्हाळ्यात मागणी कमी होते. सध्या शेवग्याला मागणी कमी झाली असल्याने दरात सातत्याने घसरण होत आहे. येत्या काळात दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
- प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT