पुणे

Crime News : पाच जणांकडून 25 लाखांचे अमली पदार्थ जप्त

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 ने जानेवारी महिन्यात विविध ठिकाणी कारवाई करत 5 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 25 लाखांचे 121 ग्रॅम एमडी जप्त केले आहे. ही कारवाई हडपसर, लष्कर, फरासखाना, बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. दि. 2 जानेवारी रोजी केशवनगर मांजरीत एक जण एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून शिवम शिवप्रसाद सोनुने (वय 21, घुलेनगर, वाघोली) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1 लाख 6 हजारांचे 5.30 ग्रॅम मेफेड्रॉन आणि 10 हजारांचा एक मोबाईल जप्त केला आहे. सोनुने विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, डुल्या मारुतीशेजारी असणार्‍या दावत रेस्टॅरंटमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अरबाज रफिक बागेवाडी (वय 26, मिठानगर, कोंढवा) येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे 60 हजार किंमतीचा 3 ग्रॅम एमडी आढळून आला. बागेवाडी याच्याकडून 1 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बागेवाडीसह अफाक अन्सार खान (रा. गणेश पेठ) याच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दि. 6 जानेवारी रोजी लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हेवन हाऊस इंटनॅशनल बारबलमध्ये केलेल्या कारवाईत मोहम्मद अल्ताफ पटेल (वय 24, एम जी रस्ता) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1 लाख 6 हजार किंमतीचा 5.800 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्याच्यावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दि. 12 जानेवारी बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक जण ड्रग्स विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून विरेश नगीनभाई रुपासरी (वय 53, रा. विलेपार्ले, मुंबई, मूळ रा. सिल्व्हासा, दादरनगर हवेली) याला ताब्यात घेण्यात आले होते. रुपासरीकडून 21 लाख 52 हजार किंमतीचे 107 ग्रॅम एमडी, 6 हजार 400 रुपये रोख, एक हजाराचा वजन काटा आणि 20 हजारांचा मोबाईल असा 22 लाख 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

रुपासरीवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करत होते. रुपासरी हा अमजद हसमत अली सय्यद उर्फ सनी उर्फ फैयज (वय 48, सांताक्रुज इस्ट, मुंबई) याच्या मदतीने मेफेड्रोनची विक्री करत असल्याचे माहिती मिळाली होती. यानंतर अमजद हसमत अली सय्यद हा दुबईला पळून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर दोन पथके पाठवून अमजद सय्यद याला दुबईला पळून जात असताना मिरा भाईंदर येथून ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्याला अटक केली आहे.

अशा प्रकारे जानेवारी महिन्यात कारवाई करून 25 लाखांचे मेफेड्रोन जप्त केले आहे, ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलिस अंमलदार विशाल शिंदे, योगेश मोहिते, सुजित वाडेकर, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी आदींच्या पथकाने केली.

SCROLL FOR NEXT