पुणे

दुष्काळी झळा ! येडगाव धरणाने गाठला तळ

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : येडगाव धरणातील पाण्याने तळ गाठल्याने परिसरातील शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे पूर्व भागातील तालुक्यांसाठी 12 एप्रिलपर्यंत पाण्याचे आवर्तन सुरू राहणार आहे, तोपर्यंत धरण पूर्णपणे कोरडे होण्याची भीती येथील शेतकरी व्यक्त करत आहेत. येडगाव परिसरातील शेतकर्‍यांनी सुमारे 2 हजार एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली आहे. उसाची लागवड 3 हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रामध्ये आहे. द्राक्षबागेची लागवड 500 एकरवर आहे. याशिवाय फ्लॉवर, कोबी, गाजर, मेथी, कोथिंबीर, वांगी, दोडका, गवार, मिरची, तोंडली आदी तरकारी पिकेही 500 एकर क्षेत्रात आहेत. मात्र, दिवसेंदिवस तापमानात होणार्‍या वाढीने पाण्याची गरज वाढलेली आहे. मात्र, धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.

धरणामधून नारायणगाव, कांदळी वडगाव, ओझर या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. परंतु धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे 12 एप्रिलपर्यंत पाण्याचे आवर्तन सुरू राहणार आहे. येत्या काही दिवसांतच धरण पूर्णपणे कोरडे पडू शकते. अनेक शेतकर्‍यांचे धरणातील वीजपंप उघडे पडले आहेत. पूर्व भागातील तालुक्यांसाठी धरणातून सुरू असलेले पाण्याचे आवर्तन तत्काळ बंद करावे, अशी मागणी या परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. निम्मा उन्हाळा अजूनही शिल्लक आहे. अनेकदा जुलैअखेरदेखील पाऊस पडत नाही. त्यामुळे येडगाव धरणातील पाणी पिण्यासाठी तरी पुरेल का, याबाबत सगळ्यांच्याच मनामध्ये शंका आहे. त्यामुळे प्रशासनाने धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवणे गरजेचे आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT