लोणी-धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, मांदळेवाडी, वडगावपीर, शिरदाळे, पहाडदरा या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणार्या गावांत सध्या पावसाने पाठ फिरवली आहे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गावोगावी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे माणसे कशीही जगतील; मात्र जनावरांचे काय? असा प्रश्न येथील शेतकर्यांना पडला आहे. आंबेगावचा पूर्व म्हणजे दुष्काळजन्य भाग म्हणून ओळखला जातो.
खरिपात जोरदार पावसाने हजेरी लावली तर पिके चांगली येतात. पण, जर पावसाने पाठ फिरवली तर मात्र जगायचे कसे? हा प्रश्न या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना पडतो. जूनच्या शेवटच्या आडवड्यात झालेल्या पावसावर कशीबशी पेरणी केली. पण, त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे या भागातील जलस्रोत अद्याप आटलेलेच आहेत. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. जनावरांना चारा मिळेनासा झाला आहे. पेरणीनंतर उगवलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.
सध्या मांदळेवाडी, वडगावपीर येथे पाण्याचे टँकर सुरू आहेत. पाण्याच्या टँकरमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मिटला आहे. पण, जनावरांच्या चार्याचे काय? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. या भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पण, सध्या पाऊस नसल्याने चार्यासाठी येथील शेतकर्यांना वणवण करावी लागते. शेतकरी शिरूर, खेड, आंबेगाव या तालुक्यांच्या बागायत पट्ट्यात जाऊन हिरवा चारा खरेदी करीत आहेत. त्यासाठी अवाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत, तेदेखील परवडेनासे झाले आहे.
या भागातील दुष्काळसदृश परिस्थिती पाहता शासनाने त्वरित चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा स्वस्त दरात चारा उपलब्ध करून घावा, अशी मागणी अवसरी-पारगाव जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळशीराम वाळुंज, मांदळेवाडीच्या माजी उपसरपंच माधुरी संतोष आदक, सदस्या ज्योती गोरडे व या भागातील शेतकर्यांनी केली आहे.
हेही वाचा