पुणे: पुरंदर विमानतळासाठी संपादित करण्यात येणार्या जमिनीचा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने ड्रोन सर्व्हे करण्यात येणार आहे. मोजणीपूर्वी हा सर्व्हे केला जाणार आहे. त्यामुळे नेमक्या बागायत, जिरायत जमिनी किती आहेत, त्याचे प्रमाण किती, झाडे किती, इमारती, विहिरी किती आणि कोठे आहेत याची माहिती या सर्व्हेतून मिळणार असून दरनिश्चिती करताना त्याचा फायदा होणार आहे.
पुरंदर विमानतळासाठी वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून 2753.053 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 2673.982 हेक्टर क्षेत्र हे खासगी क्षेत्र आहे. तसेच 79.071 हेक्टर क्षेत्र हे सरकारी जमीन आहे. खासगी क्षेत्र 2673.982 हेक्टर क्षेत्रापैकी 428.21 हेक्टर हे जिरायत क्षेत्र आहे.
तसेच 2235.352 हे बागायत क्षेत्र आहे. तसेच 10.42 हेक्टर क्षेत्र हे बिनशेती आहे. त्यामुळे या जमिनींचा ड्रोन सर्व्हे करून प्रत्यक्षात त्याची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर एमआयडीसी आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकार्यांकडून संयुक्त मोजणीवेळी ड्रोन सर्व्हेच्या अहवालातील बाबींची पडताळणी केली जाणार आहे.
यापूर्वी पुणे रिंगरोडसाठी सुद्धा जमिनीचे संपादन करण्यापूर्वी ड्रोन सर्व्हे करण्यात आला होता. त्या वेळी संपादित करण्यात येणार्या गावांमधील झाडे, इमारती, जमिनीच्या प्रतवारीची माहिती सर्व्हेद्वारे घेण्यात आली होती. तोच प्रयोग आता पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनापूर्वी केला जाणार आहे. दरम्यान, पुरंदर विमानतळासाठी संपादित केल्या जाणार्या सात गावांमध्ये 75.50 हेक्टर क्षेत्र हे वन जमीन आहे. हे वनक्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास वर्ग करण्यासाठी फॉरेस्ट डायव्हर्जन प्रपोजल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.
पुरंदर विमानतळासाठीच्या सात गावांतील जमिनीचे संपादन करण्यासाठी भूसंपादन अधिकार्यांच्या नियुक्तीचे आदेश अद्याप काढण्यात आले नाहीत. ते आदेश आल्यानंतर जमिनीची संयुक्त मोजणीसाठी शुल्क भरण्यास एमआयडीसीकडून कार्यवाही केली जाईल. तत्पूर्वी ड्रोन सर्व्हे करून तेथील जमिनीची माहिती घेतली जाणार आहे.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी