खडकी; पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे टँकरद्वारे पिण्याचे पाणी मागितल्यास वापरण्याचे पाणी पुरवण्यात येत असून, ते पिण्यायोग्य नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे विविध कार्यक्रमांसाठी टँकरद्वारे पिण्याचे पाणी मागविणार्यांची गैरसोय होत आहे. तसेच अपुरा पाणीपुरवठा झाल्यास पिण्यासाठी पाण्याची मागणी करणार्या नागरिकांचीदेखील अडचण होत आहे. प्रशासनाने टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
बोर्ड प्रशासनाकडून नागरिकांना टँकरद्वारे वापरण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. एक टँकरची क्षमता तीन हजार लिटर असून, त्यासाठी सातशे रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याचे आरोग्य अधीक्षक शिरीष पत्ती यांनी सांगितले. खडकी परिसरात सकाळी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा कमी झाल्यास रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते.
तसेच लग्नकार्य, समारंभ आदी कार्यक्रमासाठीदेखील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज असते. मात्र, प्रशासनाकडून टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत नसून, वापरण्याचे पाणी मिळत नसल्याचे नागरिकांना सांगितले. विवाह समारंभांसह विविध कार्यक्रमांसाठी पिण्याच्या पाण्याची गरज भासल्यास नागरिकांना कॅन विकत आणावे लागत आहे. यामुळे प्रत्येक कॅनमागे सुमारे 30 ते 40 रुपये खर्च येत आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला याआधी पुणे महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, आता महापालिकेने पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी पाणीपुरवठा बंद केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
– शिरीष पत्की,
आरोग्य निरीक्षक, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डलग्नकार्यात खाद्यपदार्थ बनविणे तसेच साफसफाईसाठी नागरिकांना पाण्याची मोठी गरज भासते. यामुळे नागरिकांना बोर्डाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागते. मात्र, बोर्ड प्रशासनाकडून टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात नाही.
– राजेश रासगे, रहिवासी, खडकी.
विवाह समारंभासह विविध कार्यक्रमांसाठी बोर्डाच्या टँकरद्वारे पिण्याचे पाणी देण्यात येत नाही. टँकरद्वारे देण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने कॅनचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
– सुरेश ससाने, रहिवासी, खडकी.