निनाद देशमुख
पुणे: पुण्यातील बांधकामांसाठी राजरोसपणे पिण्याचे पाणी वापरले जात असून, अशा बांधकाम प्रकल्पांवर कुठलीच कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. एकीकडे उन्हाळ्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना पाण्याची ही उधळपट्टी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, पालिकेकडे यंत्रणा नसल्याने नुसती बघ्याची भूमिका घेतली जात आहे.
उन्हाळ्यामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करताना पालिकेची दमछाक होत आहे. काही भागांत तर अघोषित पाणीटंचाई असून, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. काही भागांत दोन ते तीन दिवस पाणीच येत नसल्याच्या नागरिक तक्रारी करीत आहेत.
असे असताना शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक असताना बिनदिक्कत पिण्यायोग्य पाणी वापरले जात आहे. अनेक बांधकाम व्यावसायिक थेट टँकरने हे पाणी आणत आहेत, तर काही ठिकाणी पालिकेच्या योजनेतून पाणी वापरले जात आहे.
मात्र, कर्मचारी नसल्याने अशा बांधकामांवर कारवाई करता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याचे वेगाने शहरीकरण होत आहे. मोठ्या प्रमाणात पुण्यात गृहप्रकल्प उभे राहत आहेत.
या बांधकाम प्रकल्पांना समाविष्ट गावांमध्ये मोठे गृहप्रकल्प
पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांमध्ये पाण्याची मोठी ओरड आहे. येथे प्रामुख्याने कोणतीही पाणी योजना नसल्याने प्रामुख्याने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. समाविष्ट गावांसह कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी, हडपसर, येरवडा, खराडी यासह चंदननगर परिसरात देखील मोठे गृहप्रकल्प सुरू आहेत. येथील प्रकल्पांना देखील महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी बांधकामांसाठी वापरले जात आहे.
पालिकेच्या 10 प्रकल्पांमध्ये होते सांडपाण्यावर प्रक्रिया
पुण्यात सांडपाणी प्रकल्पावर प्रक्रिया करण्यासाठी 10 सांडपाणी प्रकल्प आहेत. यात 500 पेक्षा जास्त एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, हे प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम प्रकल्पाला वापरणे अपेक्षित आहे. हे पाणी साठवून ठेवल्यास त्याचा वास येत असल्याच्या तक्रारी काहींनी केल्याने या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेक तक्रारी
पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे बांधकाम व्यावसायिक थेट पिण्याचे पाणी वापरत असल्याच्या काही तक्रारी मिळाल्या आहेत. बांधकाम प्रकल्पासह शहरातील वॉशिंग सेंटरवर देखील गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. मात्र, उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व्यस्त असल्याने बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्यास पालिका असमर्थ आहे.