पुणे

ड्रेनेजचे काम अखेर सुरू; बिबवेवाडीतील समस्या सुटणार

अमृता चौगुले

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरातील अप्पर येथील संविधान चौकातील ड्रेनेज गेल्या काही महिन्यांपासून तुंबली होती. यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत दैनिक 'पुढारी'ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने या ठिकाणी नवीन ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे.

डॉल्फिन चौक ते संविधान चौक आणि संविधान चौक ते चिंतामणीनगरपर्यंत ड्रेनेजलाइनचे काम गेल्या काळात चुकीचे झाले होते. यामुळे ही वाहिनी तुंबल्याने रस्त्यावरून वाहणार्‍या ड्रेनेजच्या पाण्याचा त्रास गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना सहन करावा लागत होता. याबाबत दैनिक 'पुढारी'ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. तसेच, येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश मोहिते, गनिमी कावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, अजय भोकरे, अविनाश खेडेकर आदींनी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

या सर्वांची दखल घेत महापालिका प्रशासनाने या वाहिनीच्या कामास अखेर सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात हे काम पूर्ण होऊन परिसरातील नागरिकांची या समस्येपासून सुटका होणार आहे. मोहिते म्हणाले, 'संविधान चौकातील ड्रेनेजलाइनबाबत वेळोवेळी महापालिकेकडे पाठपुरावा केला. तसेच, दैनिक 'पुढारी'ने देखील या समस्येबाबत आवाज उठविला. यामुळे ही समस्या आता सुटणार आहे.'

संविधान चौकातील ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला होता. यामुळे जुनी ड्रेनेजलाइन काढून त्या ठिकाणी चोवीस इंचाची नवीन वाहिनी टाकण्यात येत आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे.
                                                           – संतोष तांदळे,
                                     अधीक्षक अभियंता, ड्रेनेज विभाग, महापालिका

SCROLL FOR NEXT