पुणे

ड्रेनेजचे पाणी रहिवाशांच्या घरांत; कोंढवा बुद्रुक परिसरातील स्थिती

अमृता चौगुले

कोंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून ड्रेनेजलाईन तुंबल्यामुळे कोंढवा बुद्रुक परिसरातील व्हीआयटी कॉलेजच्या पाठीमागील गल्लीमध्ये सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. काही रहिवाशांच्या घरांमध्ये हे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसानही झाले आहे. या घरातील लोकांना दुस-याच्या घरी राहावे लागत आहे. याबाबत महापालिका प्रशासनास कळवूनदेखील दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक 41 मधील व्हीआयटी कॉलेजच्या परिसरातील गल्लीत गेल्या चार दिवसांपासून सांडपाणी तुंबल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी असलेला रस्ता सांडपाण्याखाली गेल्याने नागरिकांना विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे. शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. हाजू शेख, भारत दगडे, राजू खैरे या रहिवाशांच्या घरांमध्ये सांडपाणी शिरल्याने ऐन पावसाळ्यात त्यांच्या निवार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना इतर नागरिकांच्या घरात आश्रय घेण्याची वेळ आली आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरल्याने परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचालक व पादचार्‍यांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.

या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेकडे तक्रार केली आहे; परंतु प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या काळात लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने सांडपाणी वाहिन्यांचे योग्य नियोजन केले नसल्याने सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे लोकप्रतिनिधी आगामी निवडणुकीत मते मागायला येतील, त्या वेळी मतपेटीतून त्यांना योग्य उत्तर दिले जाणार असल्याचे सांगून रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

महापालिकेचे अधिकारी नरेश शिंगाटे, भोसले, शिरोडकर यांना या समस्येबाबत माहिती दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे नागरिकांनी सांगितले. अधिकारी प्रतिसाद देत नसल्यामुळे रहिवाशांनी स्वखर्चातून जेसीबीने रस्त्यांत दोन खड्डे खोदून सांडपाण्याचा मार्ग मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सांडपाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ही समस्या 'जैसे थे' आहे.

गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणी सांडपाणी तुंबले असून, नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक आजारी पडत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर रहिवाशांना घरे सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.

– हाजू शेख, रहिवासी

सांडपाण्याच्या समस्येबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. रहिवाशांचे यामुळे हाल होत असून, अधिकार्‍यांना त्याचे कोणतेही सोयीरसुतक नाही. सध्याची परिस्थिती पाहता, या भागात साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे.

– समीर शिंदे,
सामाजिक कार्यकर्ते

ड्रेनेजलाईनचे काम करत असताना चेंबर ढासळल्याने हे सांडपाणी तुंबले आहे. दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असून, या कामासाठी पोकलेन मशीनची गरज आहे. ते मिळाल्यानंतर तातडीने हे काम पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.

– नरेश सिंगाटे, अधिकारी, सांडपाणी विभाग, महापालिका

SCROLL FOR NEXT