पुणे

बसथांब्यासमोर गाळ अन् राडारोडा; बिबवेवाडीतील संविधान चौक परिसरातील समस्या

अमृता चौगुले

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा: बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील बसथांब्यासमोर उकरण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनचा गाळ व राडाराडा टाकण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिक व प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. बिबवेवाडी येथील संविधान चौकाच्या परिसरात व्हीआयटी कॉलेजचा बसथांब आहे. या ठिकाणी ड्रेनेजमधून काढलेला गाळ व राडारोडा गेले पाच दिवसांपासून पडून आहे. त्यामुळे प्रवाशांची व पादचार्‍यांची मोठी गैरसोय होत आहे.

याबाबत महापालिकेच्या कर्मचार्‍यांना विचारले असता, गाळ वाळल्यानंतरच तो उचला जाईल, असे सांगण्यात आले. या चौकात गेल्या महिनाभरापासून ड्रेनेज लाईनची समस्या बिकट असतानाच आता बसथांब्यासमोर रस्त्याच्या कडेला गाळ व राडाराडा पडून आहे. सकाळच्या वेळी या ठिकाणी ड्रेनेजच्या पाण्याचा दाब जात असल्याने ते रस्त्यावरून वाहत आहे.

त्यामुळे वाहनचालक, पादचारी व पीएमपीच्या प्रवाशांना या ठिकाणी चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित गाळ व राडारोडा उचलण्याची मागणी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश खेडेकर व नागरिकांनी केली आहे.

संविधान चौकातील ड्रेनेजचे काम झाल्याने येथील माती, राडाराडा व गाळ गेले दोन-तीन दिवसांपासून बाजूला ठेवला आहे. तो लवकरात लवकर उचलण्यात येईल.

                                                                         -दीपक सोनवणे,
                                                 शाखा अभियंता, ड्रेनेज विभाग, महापालिका

SCROLL FOR NEXT