dragon fruit farming
काटेवाडी: काटेवाडी (ता. बारामती) येथील भाऊसाहेब किसन वणवे या शेतकर्याने जिरायती क्षेत्रात ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली आहे. युट्यूबवरून धडे घेत त्यांनी ‘ड्रॅगन फ्रुट’ची लागवड केली.
वणवे यांच्याकडे परिसरातील खरमाटे वस्ती येथे जिरायत नऊ एकर व बागायती चार एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रात ऊस, मका, ज्वारी, बाजरी, तूर व इतर पिके ते घेतात. आता त्यांनी माळरानावर ‘ड्रॅगन फ्रुट’चे उत्पादन घेतले आहे. वीस गुंठ्यांत ‘ड्रॅगन फ्रुट’ची शेती यशस्वी करून त्यांनी लाखोंचे उत्पन्न मिळविले. (Latest Pune News)
वणवे यांनी वीस गुंठ्यांत गादी वाफा तयार करून सिमेंटचे खांब उभे केले. काही अंतरावर 1200 ‘ड्रॅगन फ्रुट’ची रोपे लावली. मशागत, रोपे लागवड, कीटकनाशक औषधे, मजुरी आदींसह सुरुवातीला दोन लाख 50 हजारच्या आसपास खर्च आला. सुरुवातीलाच नऊ टनउत्पन्न निघाले. त्या वेळी भावही चांगला मिळाल्याने पाच लाखांचे उत्पन्न मिळाले.
सुरुवातीला 60 ते 80 रुपये किलो या बाजारभावाने पुणे, वाशी, मुंबई मार्केटमध्ये विक्री केली. मुंबई, पुणे, नाशिक येथून व्यापारी जागेवरच माल घेतात. मात्र, गणेशोत्सव व गौराई सणामुळे व्यापार्यांवर अवलंबून न राहता थेट स्थानिक बाजारपेठेतही माल पाठविला. त्यामुळे भाव चांगला मिळाला. त्यांना पत्नी मीनाक्षी, मुलगा रोहित, प्रशांत यांची मदत झाली.
कष्टास व्यवस्थापनाची जोड
जिरायती भाग, पाण्याची कमतरता आणि माळरान जमीन यामुळे अधिक उत्पन्न मिळणे कठीण होते. शेततळ्याच्या माध्यमातून त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडविला. इच्छाशक्ती, कष्टास योग्य व्यवस्थापनाची जोड दिल्यास हमखास यश मिळते, हे वणवे यांनी दाखवून दिले.