बारामती : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवारांना बारामतीतून उच्चांकी मतदान देऊ, अशी ग्वाही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बारामतीत पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांना दिली.
डॉ. जाधव यांनी मंगळवारी (दि. २०) बारामतीचा दौरा केला. यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये जाऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे यांच्या निवासस्थानी त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी गावडे यांच्यासह भाजप नेते अविनाश मोटे, दिलीप खैरे, पांडुरंग कचरे, ॲड. गोविंद देवकाते, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल, भाजपचे पोपटराव खैरे, ॲड. शामराव कोकरे, सुजित वायसे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गोरख पारसे आदी उपस्थित होते.
गावडे यांनी बारामतीतील कामकाजाचा आढावा डॉ. स्मिताताई जाधव यांच्यासमोर मांडला. बारामतीत बूथनिहाय जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. बारामतीतील नियोजन अत्यंत चोख झाले आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना उच्चांकी मतदान होईल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांच्या वतीने दिली.
डॉ. स्मिताताई जाधव यांनी बारामतीतील टीमच्या कामकाजाचे कौतुक करत सर्वांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.