पुणे; पुढारी वृत्तसेवा : चरित्रलेखन म्हणजे निव्वळ इतिहासलेखन नाही. चरित्रलेखन ही साहित्याच्या जवळची शाखा असली, तरी ते साहित्य नाही. चरित्र एकाच व्यक्तीचे असावे, असा नियम नाही. समूहाचेही असू शकते. महाराष्ट्रातील सुधारकांचा नव्याने अभ्यास करून त्यांचे संशोधनात्मक लेखन होणे गरजेचे आहे.
काळाच्या पडद्याआड गेलेले आचार्य अत्रे, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, गोदावरी परुळेकर यांच्यावर नव्याने संशोधनात्मक लेखन होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लेखक-विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी शुक्रवारी व्यक्त केले. संशोधन करून चरित्रात्मक लेखन करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 118 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. गुहा यांच्या हस्ते वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्या वेळी डॉ. गुहा बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार
उपस्थित होते.
चरित्रलेखनाविषयी डॉ. गुहा म्हणाले की, चरित्रलेखन हे व्यक्तिकेंद्रित न राहता त्या व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती, सामाजिक संदर्भ लेखनामध्ये यावेत. केवळ एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवर विसंबून राहू नका. सगळ्या गोष्टी सहज सापडणार नाहीत. पण, एकाच गोष्टीचे विविध पैलू समजून घेण्यासाठी सगळ्या बाजूंनी माहिती घेतली पाहिजे.
त्याच्या आयुष्यातील अन्य व्यक्तिरेखा यादेखील महत्त्वाच्या असतात. दुय्यम व्यक्तिरेखांचा प्रवास कसा रेखाटला आहे, यावर त्या चरित्रलेखनाची गुणवत्ता ठरते. चरित्रात्मक लेखन हे सत्याच्या आधारावर उभे असायला हवे. तिथे साहित्यातील कल्पनाविलास असू नये. आत्मचरित्रात आले नाहीत असे पैलू उलगडण्याचा प्रयत्न चरित्रकाराने करायला हवा. प्रा. जोशी यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. कसबे म्हणाले की, जग एका अरिष्टातून जात आहे. भांडवलशाहीच्या अंताची चाहूल लागलेली असल्याने नव्याचा शोध हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपाशीच येऊन थांबेल, याची जाणीव आता जगाला झालेली आहे.