पुणे

डॉ. आंबेडकर स्टेडियमची दुरवस्था : ना कराराचे नूतनीकरण, ना कराचा भरणा!

अमृता चौगुले

राजेंद्र गलांडे

बारामती : बारामती नगरपरिषदेने डी. जे. क्रिकेट अकादमीसोबत जानेवारी 2019 मध्ये करार केला. पूर्वलक्षी प्रभावानुसार तो नोव्हेंबर 2018 पासूनच लागू झाला. तीन वर्षांसाठी हा करार होता. वार्षिक भाडेपट्ट्याची रक्कम ठरली. परंतु तद्नंतर या कराराचे कोणतेही नूतनीकरण करण्यात आले नाही. गेली सव्वा वर्षे कराराविनाच डीजे क्रिकेट अकादमीकडे हे स्टेडियम आहे. शिवाय केवळ अडीच लाख रुपये वार्षिक भाडे पालिकेला देणे अपेक्षित असताना आजवर त्यांच्याकडील थकबाकीचा आकडा 8 लाख 36 हजार रुपयांवर जावून पोहोचला आहे.

बारामती नगरपरिषदेचा थकबाकीचा आकडा कोरोना कालावधीनंतर कमालीचा वाढला. शहरात पालिकेच्या मालकीचे अनेक गाळे आहेत. गाळेधारक संघटनेने कोरोना कालावधीत दुकाने बंद राहिल्याने या कालावधीतील कर माफ करावा अथवा सूट द्यावी, अशी मागणी केली होती. पालिकेकडून ती मान्य झाली नाही. दुसरीकडे डी. जे. क्रिकेट अकादमीकडील थकबाकी आता 8 लाख 36 हजारांवर जावून पोहोचली आहे. वार्षिक 2.50 लाख भाडेपट्टा ठरलेला आहे. येथे कायम सामने भरविले जातात. त्यातून उत्पन्न मिळत असताना पालिकेचा कर थकलेला आहे.

ज्या हेतूने स्टेडियमची उभारणी झाली, ती पूर्ण होताना दिसत नाही. विविध संघटना, क्लब यांच्याकडून सामने भरविल्यानंतर पवार कुटुंबीयातील कोणी ना कोणी येथे उद्घाटन, पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने येते. तेवढ्या पुरते सगळे चकाचक केले जाते. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याचे दिसून येत आहे.

स्टेडियमच्या गॅलरीवरील कापड फाटलेले आहे. नगरपरिषद ते काम करणार आहे. कापड उपलब्ध झाले आहे. स्वच्छतागृहे साफ करून घेतली जात आहेत. स्टेडियम देखभालीसाठी स्प्रिंकलरचा वापर केला जात असून, मेन्टेनन्स केला जात आहे. रेग्यूलर सामने बुकिंग सुरू आहे. मेन्टेनन्ससाठी सोमवार, मंगळवार स्टेडियम बंद ठेवले जाते. 2022 ला करार संपला. परंतु सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने नवीन करार झालेला नाही. भाडे रक्कम भरणे बाकी आहे. मार्चअखेर ती भरली जाईल, तसे पत्र पालिकेला दिले आहे. पावसाळ्यात चार महिने खेळ बंद राहतो. स्थानिकांना नेहमीच येथे संधी देत आलो आहे. रणजीपर्यंत येथील खेळाडू पोहोचले आहेत. काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील.

                                                                    धीरज जाधव,
                                                      प्रमुख, डी. जे. क्रिकेट अकादमी.

स्टेडियमच्या गॅलरीवरील कापड टाकण्यासाठी पालिकेने 24 लाखांची तरतूद केली आहे. स्टेडियम परिसरात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. अंतर्गत स्वच्छता व अन्य बाबी अकादमीने करणे अपेक्षित आहे.
काही त्रुटी असतील, तर त्या आगामी काळात दूर केल्या जातील. अकादमीकडे कर थकला आहे. तो मार्चअखेर भरला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

                                                            महेश रोकडे,
                                             मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद.

बारामतीतील खेळांडूंसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध झाली आहे. पालिकेने स्टेडियम देखभाल-दुरुस्तीसाठी देताना करारात अनेक जाचक अटी घातल्या. त्यामुळे स्थानिक क्लब, क्रिडाप्रेमी त्यात भाग घेऊ शकले नाहीत. जाचक अटी बाजूला ठेवून स्थानिक क्लबकडे देखभाल दिली तर त्याचा फायदा होईल. चांगले क्रिकेटपटू घडू शकतील. येथील दुरवस्थेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
                                                         प्रशांत सातव,
                                मार्गदर्शक, कारभारी जिमखाना क्रिकेट क्लब

SCROLL FOR NEXT