पुणे

Pune : नगर रस्त्यावरील दुमजली उड्डाणपूल रामवाडीपर्यंत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नगर रस्त्यावर एनएचआयच्या माध्यमातून होणारा दुमजली उड्डाणपूल आता वाघोलीऐवजी थेट रामवाडीपर्यंत करण्याचा आणि त्यापुढे शास्त्रीनगर चौकात महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया तातडीने राबवा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले. नागपूर हिवाळी अधिवेशनात वाहतूक कोंडीवर लक्षवेधी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मांडली होती. त्या वेळी सभागृहात उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात पुण्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार शनिवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनील टिंगरे, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे आदी उपस्थित होते.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचआयच्या माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत जो दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे, तो आता थेट विमाननगर- रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करा, अशा सूचना एनएचआयला करण्यात आल्या.

शिवणे- खराडी रस्त्याबाबतही चर्चा झाली. हा रस्ता तातडीने मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी आणि या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी सूचना पवार यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. तसेच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील धानोरी, संतनगर, फाईव्ह नाईन चौक ते धानोरी, विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करून कार्यवाही करावी अशा सूचनाही पवार यांनी केल्या आहेत.

SCROLL FOR NEXT