प्रसाद जगताप
पुणे : इलेक्ट्रिक डबल डेकर बस पुण्यात येण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मात्र, या गाड्यांसाठी आता निधीचा अडसर निर्माण झाला असून, गेल्या चार-पाच महिन्यांपासून या गाड्यांसाठी महापालिका प्रशासनाकडून अद्यापपर्यंत निधीच देण्यात आलेला नाही. याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षाच्या शेवटी झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत प्रशासनाने मुंबईच्या बेस्टच्या धर्तीवर 20 डबल डेकर बस घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या बैठकीत संचालक असलेले दोन्ही महापालिका आयुक्तदेखील उपस्थित होते. त्यावेळी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तसेच या बसची सेवा शहराच्या आजूबाजूच्या मोठ्या मार्गांवर पुरविण्याचेदेखील ठरण्यात आले. तेव्हापासून अजूनपर्यंत या बससाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे ई-डबल डेकर बस पुणेकरांना कधी पाहायला मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील 337 बसचे आयुर्मान संपत आल्याने गाड्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, विविध मार्गांवरील बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. तसेच प्रवाशांना बस वेळेवर आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने बसथांब्यांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. मात्र, प्रस्तावित असलेल्या नव्या गाड्या येण्याची चिन्हे दिसत नसल्याने पीएमपी आणि महापालिका प्रशासन प्रवाशांचे आणखी किती दिवस हाल करणार आहे, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
पीएमपीच्या ताफ्यात नव्या 600 गाड्या घेण्याचे नियोजन आहे. यात 20 ई-डबल डेकर बस असणार आहेत. महापालिका 7 मीटर लांबीच्या 300 गाड्या आम्हाला घेऊन देणार आहे. त्याची टेंडर प्रक्रिया झाली असून, भाडेतत्त्वावरील दराबाबत चर्चा सुरू आहेत. तर उर्वरित डबल डेकरसह 300 गाड्यांसाठी निधी देण्यात आलेला नाही.
– ओमप्रकाश बकोरिया,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
पीएमपीकडे येणार्या नव्या गाड्या…
सात मीटर लांबी : 300 बस
सीएनजी : 200 बस
इलेक्ट्रिक : 100 बस (त्यात 20 डबल डेकर)