पुणे

पुणे : खचू नका, मुलांमधील कर्करोग पूर्ण बरा होऊ शकतो!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कर्करोगाचे निदानच रुग्णाला निम्म्याने खचवून टाकते. त्यातच घरातील लहान मुलांमध्ये कर्करोगाचे निदान झाले तर संपूर्ण कुटुंबच कोलमडून पडते. मात्र, बहुतांश लहान मुलांमध्ये कर्करोग पूर्णपणे बरा होतो. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कर्करोगावर टार्गेटेड थेरपी, रेडिएशन थेरपीसारखे अद्ययावत उपचार उपलब्ध असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भारतात 10 लाखांमागे सुमारे 97 मुलांना कर्करोग होऊ शकतो, अशी आकडेवारी सांगते. यामध्ये ब्लड कॅन्सर बरा होण्याचे प्रमाण जास्त आहे आणि कॅन्सर लवकर आढळल्यास तो बरा होऊ शकतो.बहुतांश लहान मुलांमध्ये रक्ताचा कर्करोग आढळून येतो.

लवकरात लवकर निदान झाल्यास केमोथेरपीने कर्करोग पूर्णपणे नाहीसा करता येतो, अशी माहिती रुबी हॉलचे क्लिनिकल हेमॅटोलॉजिस्ट डॉ. विजय रामनन यांनी दिली. विकसित देशांमध्ये बाल कर्करोग नियंत्रणात येण्याचे प्रमाण 70 ते 80 टक्के तर विकसनशील देशांमध्ये 30 ते 40 टक्के आहे. मुलांमधील कर्करोगा बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेने अधोरेखित केली आहे.

मुलांमध्ये कर्करोगाच्या उपचारां मध्ये इम्युनोथेरपीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यंदाची बाल कर्करोग निवारण दिनाची थीम 'क्लोज द केअर गॅप' आहे. वय, लिंग, वशंवाद, उत्पन्नावर आधारित कर्करोग उपचारा मधील अंतर (गॅप) दूर करणे हा यामागचा उद्देश आहे.

काय सांगते संशोधन?
'द लॅन्सेस ऑनकॉलॉजी' मध्ये लहान मुलांमधील कॅन्सरबाबत प्रकाशित झालेल्या अहवाला नुसार, मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये कॅन्सरचे निदान होण्याचे प्रमाण जास्त आहे, असे निदर्शनास आले आहे. मुलांच्या तपासणीवर जास्त लक्ष दिले जात असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या संशोधकांनी याबाबतचा अभ्यास केला आहे.

काय आहेत लक्षणे?
कर्करोगामध्ये तीव्र अशक्तपणा, हालचाल कमी होणे, रक्तपेशी कमी होणे, ताप येणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यानुसार तपासण्या सुचवल्या जातात. मुलांमध्ये गुणसूत्रांच्या बदलामुळे कॅन्सर उदभवू शकतो.

प्रक्रिया केलेले अन्न, खराब झोप, जास्त स्क्रीन एक्स- पोजर, कीटकनाशके, प्लास्टिकचा वापर आणि प्राणी प्रथिने ही लहान मुलांचा कर्करोग वाढण्याची काही कारणे आहेत. लवकरात लवकर निदान, योग्य उपचारांनी मुलांमधील कर्करोग समूळ नष्ट होऊ शकतो.

                                                   – डॉ. विजय रामनन

लहान मुलांमध्ये रक्ताच्या कर्करोगासह ब्रेन ट्यूमर, यकृतातील ट्यूमर, लिंफोमा, रेटिनोब्लास्टोमा, न्यूरोब्लास्टोमा अशा प्रकारचे कर्करोग आढळतात. रक्ताचा कर्करोग केमोथेरपीने बरा होतो. मुलांमधील कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. कर्करोग बरा झाल्यावर ते सामान्य माणसाप्रमाणे निरोगी आयुष्य जगू शकतात.

– डॉ. लखन कश्यप, सहायक प्राध्यापक, ऑनकॉलॉजी विभाग, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर

SCROLL FOR NEXT