कळस; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी विविध प्रयोगांतून शेतात वाढीव उत्पन्न घेतो. हीच माहिती ते आनंदात पत्रकारांना देतात. पत्रकारांनी बातमी दिल्यानंतर सरकार म्हणते, शेतकर्यांना आता जास्तीचे उत्पन्न मिळत आहे. त्यांच्यावर कर बसवा. म्हणून माझा तुम्हाला सल्ला असेल, उत्पन्न मिळवा; पण पत्रकारांना माहिती देताना उत्पन्न सांगू नका, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकर्यांना दिला.
कळस (गोसावीवाडी, ता. इंदापूर) येथील कृषीभूषण शेतकरी मधुकर खर्चे यांच्या उसाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार येथे आले होते. मधुकर खर्चे हे एकरात 100 टन आणि 50 ते 60 कांडी असलेल्या उसाचे उत्पादन घेत आहेत. त्या उसाची पाहणी केल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला थेट कार्यक्रमातून मोबाईलव्दारे संपर्क साधून खर्चे यांच्या उसाची पाहणी करून माहिती घेण्याची सूचना केली. पवार म्हणाले की, साखर उत्पादनात यंदा भारत प्रथम क्रमांकावर आहे. हे स्थान कायम राहण्यासाठी शेतकर्यांनी उसाचे एकरी शंभर टन उसाचे उत्पादन घेण्याची गरज आहे.
साखर उद्योगात ब्राझिल या देशाचा प्रथम क्रमांक असतो. यंदा मात्र भारतानंतर ब्राझिल, ऑस्ट्रेलिया व इतर देशांची क्रमवारी आहे. देशाचा हा क्रमांक कायम राहण्याच्या दृष्टीकोनातून शेतकर्यांनी एकरी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भरतराजे भोसले, उपसरपंच विशाल राजेभोसले आदी उपस्थित होते. नीलेश खर्चे यांनी स्वागत, तर मधुकर खर्चे यांनी प्रास्ताविक केले.