महायुतीमार्फत सुरू करण्यात आलेल्या योजनांचे यश पाहून महाविकास आघाडीच्या वतीने खोट्या घोषणा केल्या जात आहेत. राज्य सरकारकडून सध्या विविध योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, आघाडीकडून सत्ता आल्यास योजनांसाठी तीन लाख कोटी खर्च करण्याचे आमिष दाखविले जात आहे. मी अर्थमंत्री असून मुळात राज्य सरकारी कर्मचार्यांचे पगार, निवृत्ती वेतन व राज्याचे राहिलेले कर्जाचे व्याज यासाठी सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये खर्च होतो. त्यामुळे महाविकास आघाडीमार्फत करण्यात येणार्या घोषणा या फसव्या असून, त्यांना बळी पडू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
चंदननगर येथे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 8) महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी पवार बोलत होते. महाराष्ट्राच्या बजेटची आकडेवारी जाहीर करीत पवार यांनी महाविकास आघाडीच्या घोषणापत्राची पोलखोल केली.
पवार म्हणाले, लाडकी बहीण योजना, मोफत तीन सिलिंडर, विद्यार्थ्यांना स्टायपेंड अशा विविध योजनांसाठी 75 हजार कोटी खर्च येतो. या योजनांचे यश पाहून महाविकास आघाडीने खोट्या घोषणा केल्या आहेत. त्यांच्या फसव्या योजनांसाठी राज्य सरकारला तीन लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारी कर्मचार्यांचे पगार, निवृत्ती वेतन व राज्याचे राहिलेले कर्जाचे व्याज यासाठी सुमारे साडेतीन लाख कोटी खर्च होतो. राज्याचे उत्पन्न सुमारे साडेसहा लाख कोटी आहे. मग पैसेच शिल्लक राहिले नाहीत, तर विरोधक विकासकामे कुठून करणार आहेत, असा सवालही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून केला.
टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून फूट पाडण्यासह दुही माजविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, माझ्यासमोरच देवेंद्र फडणवीसांनी मुळीक यांना फोन करून विधान परिषदेचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे, टिंगरे विजयी झाल्यास वडगाव शेरीलाही दोन आमदार मिळणार असून, त्यामुळे मेट्रो, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, मूलभूत सुविधांसाठी भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोधकांकडे दुर्लक्ष करत सावध राहावे, असेही पवार यांनी नमूद केले.