पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'शिक्षण घेताना विद्यार्थी ध्येय निश्चित करतात. ते गाठण्याचे प्रयत्नही करतात. हे निश्चय करताना आपल्याला शक्य होईल का, अशी मनात शंका घेऊन काहीही करू नका. जे करायचे आहे, ते बिनधास्त करा. जे होते ते चांगलेच होते,' असा सल्ला पोलिस महासंचालक व मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिला. फणसाळकर यांचा स. प. महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळ आणि शिक्षण प्रसारक मंडळी, शिक्षण नियामक मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदानंद फडके हे होते, तर व्यासपीठावर एस. के. जैन, श्रीकृष्ण चितळे, गजेंद्र पवार, प्राचार्य सुनील गायकवाड, माजी प्राचार्य दिलीप शेठ हे उपस्थित होते.
फणसाळकर म्हणाले, 'मी आजपर्यंत अनेक सत्कार स्वीकारले. मात्र, आज आपल्या महाविद्यालयात होत असलेला सत्कार मी नम—पणे स्वीकारतो. महाविद्यालयीन काळातील खूप आठवणी आहेत. त्यांना सत्काराच्या निमित्ताने पुन्हा एकदा उजाळा मिळाला. मी इंग्रजीचा तास कधीही चुकविला नाही. आम्हा मित्रांच्या खोडसाळपणामुळे तुम्ही कॉलेजला येऊ नका, असे बजावण्यात आले. मात्र, ज्यावेळी बारावीचा निकाल आला त्यावेळी घरी येऊन माझा सत्कार करण्यात आला.' 'मी मराठी असल्याचा मला अभिमान असून, मुंबई पोलिस आयुक्त झालो, त्यावेळी पोलिस विभागाचे कामकाज मराठीत करण्याचा निर्णय घेतला. मराठी टिकली पाहिजे,' असे फणसाळकर यांनी सांगितले.