जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. यावर्षीच्या बाजारासाठी गुजरात मधील अमरेली , सौराष्ट्रातील राजकोट व राज्याच्या विविध भागातून विक्रीसाठी गाढवे , व्यापारी दाखल झाले आहेत. ज्या समाजाचा उदरनिर्वाह गाढवावर अवलंबून असतो त्या बहुजन समाजातील लोक येथे कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शना बरोबरच गाढवांचा खरेदी विक्रीसाठी येत असतात.
सोमवारी (दि. 13) पौष पौर्णिमे निमित्त जेजुरीतील बंगाली पटांगणात पारंपरिक पद्धतीने गाढवांचा बाजार असून शनिवार पासूनच गाढवांची खरेदी विक्री सुरू झाली आहे. गुजरात मधील अम्रेली व सौराष्ट्रातून राजकोट भागातून दरवर्षी दोनशे ते तीनशे गाढवे विक्रीसाठी येत असतात.
गाढवांची संख्या कमी झाल्याने यावर्षी केवळ सत्तर काठेवाडी गाढवे विक्रीसाठी आली आहेत. प्रत्येक गाढवाला 40 हजार ते 75 हजार रुपये भाव मिळेल असे भूपत रावळ व बाला भाई गदेवाले या व्यापाऱ्यांनी सांगितले.
पूर्वी काठेवाडी गाढवांची विक्री उधारी मध्ये होत होती. पुढच्या बाजारात उधारी दिली जात होती.आता मात्र गाढवांची संख्या कमी होवून मागणी वाढल्याने उधारीवर विक्री बंद झाल्याचे ही व्यापाऱ्यांनी सांगितले.
बारामती,अकलूज,फलटण आदी भागांतून सुमारे 200 गावठी गाढवे विक्रीसाठी आली असून या गाढवांना 30 ते 40 हजार रुपये भाव मिळेल. दोन दिवसात आणखी गाढवे या बाजारात दाखल होतील.
गाढवांची किंमत त्यांच्या दातांवरून ठरत असते. गाढवाचं दात पाहून गाढवे खरेदी करतात.दोन दातांचा दुवान,चार दातांचा चवान व संपूर्ण दात असणारा अखंड असे प्रकार असून अखंड दाताच्या गाढवाला चांगली किंमत मिळते.
खंडोबा हा बहुजन समाजाचा लोकदेव असून दरवर्षी देवदर्शन आणि गाढवाच्या बाजारासाठी आम्ही येत असतो, वाहतुकीसाठी गाड्यांचा वापर वाढल्याने गाढवांचा वापर कमी झाला आहे. ज्या ठिकाणी गाड्या जात नाहीत त्याच ठिकाणी गाढवांचा उपयोग होतो. या वर्षी बाजारात गाढवे कमी आली असून गावरान गाढवांना तीस ते चाळीस हजार रुपये पर्यंत भाव मिळेल असे अकलूज येथील व्यापारी विजय पवार व आदित्य धोत्रे यांनी सांगितले.
यंत्रयुगात दिवसेंदिवस गाढवांच्या पाठीवरचे ओझे कमी होत असल्याने या गाढवाच्या बाजाराला उतरती कळा सुरू झाली आहे.मात्र माणसांच्या भाऊगर्दीत गाढवांची किंमत टिकून आहे. रविवार आणि सोमवार येथील बाजारात खरेदी विक्रीची उलाढाल होणार आहे. जेजुरीत गाढवांच्या बाजारासाठी गाढवे दाखल झाली आहेत.