पुणे

राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा बोलबाला

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी- बारावीच्या
परीक्षेत यंदा कॉपीमुक्त अभियानाचा बोलबाला असल्याचे पहायला मिळाले. 2020 च्या नियमित परीक्षेची 2023 च्या नियमित परीक्षेबरोबर तुलना केली असता, यंदा बारावीचे 260 तर दहावीचे केवळ 113 कॉपीबहाद्दर सापडले. कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना विविध सवलती देण्यात आल्या होत्या. यंदा त्या सर्व सवलती रद्द करून प्रचलित पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला.

तसेच दहावी- बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. त्यात प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक आणि पोलिस बंदोबस्त, भरारी पथकांच्या भेटी, सहायक परीरक्षकाकडून (रनर) प्रश्नपत्रिकांची वाहतूक करताना जीपीएस ट्रॅकिंग आणि चित्रीकरण आदी उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे राज्यात गैरप्रकारांच्या विविध घटना उघडकीस आल्या. त्यापैकी दहा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले. प्रश्नपत्रिका समाजमाध्यमात पसरवणे, कॉपीसाठी साहाय्य करणे, धमकी आणि खंडणी अशा गैरप्रकारांसाठी गुन्हे दाखल केले.

त्यात सर्वाधिक तीन गुन्हे अमरावती विभागीय कार्यालयाअंतर्गत, प्रत्येकी दोन गुन्हे पुणे, नागपूर, औरंगाबाद विभागीय कार्यालयाअंतर्गत, तर एक गुन्हा मुंबई विभागीय कार्यालयाअंतर्गत दाखल झाला आहे.
दहावी- बारावीची पारंपरिक परीक्षा 2020 नंतर 2023 ला झाली. त्यामुळे दोन्ही परीक्षांची तुलना केली तर यंदा मोठ्या प्रमाणात कॉपीबहाद्दरांची संख्या घटल्याचे पहायला मिळाले अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

दहावी- बारावीची कॉपीची तुलना
2020
दहावी – 589
बारावी – 996

2023
दहावी 113
बारावी – 260

SCROLL FOR NEXT