Domestic Workers Women Pudhari
पुणे

Domestic Workers Women: घरकामगार महिलांचे जगणे आजही संघर्षमयच; पहाटेपासून रात्रीपर्यंत कष्टाची अखंड धावपळ

महागाईच्या झळा, अपुरा मोबदला आणि संसाराचा भार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘मी तीन घरांमध्ये धुणी- भांडीचे काम करते. महिन्याला पाच- सहा हजार रुपये मिळतात. पण, त्यात चार जणांच्या कुटुंबाचा खर्च भागत नाही. मुलांचे शिक्षण, घरभाडे आणि रोजचा खर्च, यासाठी काम केल्याशिवाय पर्याय नाही.

दिवसभर कष्ट केल्यानंतर शरीर थकून जाते; पण मुलांनी शिकून मोठे व्हावे, हेच स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे उठते. कष्टाशिवाय आमच्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नाही...’ अशा शब्दांत घरकामगार असलेल्या सुनीता (नाव बदलले आहे) यांनी आपल्या आयुष्याचा संघर्षमयी पट उलगडला.

सकाळी स्वतःच्या घरातील चूल पेटवून, मुलांचा डबा, नाष्टा आणि घरची कामे उरकून या महिला दुसऱ्यांच्या घरांकडे धाव घेतात. एका घरातून दुसऱ्या घरात, एका सोसायटीतून दुसऱ्या सोसायटीत, अशी त्यांची दिवसभर पायपीट सुरू असते.

कोणाकडे धुणी- भांडी, कोणाकडे झाडलोट, तर कोणाकडे फरशी पुसणे किंवा स्वयंपाक... इतरांच्या घरात स्वच्छता, नीटनेटकेपणा आणताना स्वतःच्या थकव्यालाही त्या हसत सामोऱ्या जातात. दिवस कधी संपतो, हे त्यांनाही कळत नाही; मात्र महिनाअखेरीस हातात पडणारे दहा ते पंधरा हजार रुपये वाढत्या महागाईसमोर अपुरेच ठरतात.

घरभाडे, गृहकर्जाचे हप्ते, वीजबिले, किराणा, औषधोपचार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवताना अनेक महिलांचा पगार महिन्याच्या मध्यावरच संपतो. त्यातही अनेक महिला कुटुंबातील एकमेव कमावत्या आहेत. पती आजारी असणे, व्यसनाधीन असणे किंवा नियमित रोजगार नसणे अशा परिस्थितीत संपूर्ण संसाराचा भार त्यांच्या खांद्यावर येतो.

एक दिवस कामाला सुट्टी घेतली, तर त्या दिवसाचा पगार बुडतो आणि घराचे संपूर्ण आर्थिक गणित विस्कटते. त्यामुळे त्या सुट्टी न घेता त्या कष्ट करतात फक्त कुटुंबासाठी. आजही बहुतांश घरकामगार महिलांना नोकरीची कोणतीही हमी नाही. त्यांच्या श्रमांना योग्य मोबदला, सामाजिक सुरक्षा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘कामवाली’ नव्हे, तर ‘घरकामगार महिला’ म्हणून सन्मान मिळणे, हीच काळाची खरी गरज आहे.

चार घरांमध्ये स्वयंपाकाचे काम करणाऱ्या शकुंतला घोरपडे यांचाही संघर्ष असाच आहे. शकुंतला म्हणाल्या, ‘चार घरांमध्ये काम करून महिन्याला साधारण १२ हजार रुपये मिळतात; पण आजच्या महागाईत हा पगार अजिबात पुरत नाही. आमच्या कुटुंबात पाच जण आहेत आणि घराची मुख्य जबाबदारी माझ्यावरच आहे.

दरमहा १६ हजार रुपयांचा गृहकर्जाचा हप्ता भरावा लागतो. घरखर्च, किराणा, वीजबिल, औषधोपचार आणि इतर आवश्यक खर्च भागवताना प्रत्येक महिन्यात पैशांचा ताळमेळ घालणे, हीच सर्वांत मोठी कसरत असते. अनेकदा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आधी कुटुंबाचा विचार करावा लागतो. आम्हालाही सन्मानाने वागणूक मिळावी, दोन प्रेमाचे शब्द मिळावेत, एवढीच अपेक्षा असते.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT