पुणे

हकालपट्टीचा अधिकार जिल्हाध्यक्षांना आहे का? जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांचे गारटकर यांच्यावर टीकास्त्र

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून ज्यांनी माझ्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे, त्यांना कारवाईचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे नाव न घेता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) संचालक विकास दांगट यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह खा. सुप्रिया सुळे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हेच माझे नेते असल्याचे ते म्हणाले.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी विकास दांगट यांची मंगळवारी (दि.25) हकालपट्टी केल्याचे घोषित केले. त्यावर दांगट यांनी बुधवारी (दि.26) पत्रकार परिषद घेऊन कारवाईस जोरदार प्रत्युत्तर देत भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सहकारात पक्षीय राजकारण होत नसल्याचे सांगितले आहे. मात्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माझ्याकडून पराभूत झालेल्या उमेदवारांनीच पक्षाचा पॅनेल उभा करण्याचा घाट घातला असल्याचा आरोपही दांगट यांनी केला आहे. हवेली तालुका हा पुणे शहराच्या आजूबाजूला पसरलेला असून, येथे नात्यागोत्यांचे राजकारण चालते. आमच्या पॅनेलमध्ये सर्वाधिक उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, इतर महाविकास आघाडीलाही संधी दिली आहे. भाजपचा केवळ एकच उमेदवार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.

"जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही गैर गोष्टी कोणाकडून घडत असतील त्यावर कारवाईचे अधिकार हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मलाच आहेत. विकास दांगट यांच्या पक्षविरोधी कारवायांबद्दल खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या दोघांशी चर्चा करून आणि त्यांच्या सूचनेनुसारच हकालपट्टीची कारवाई केली आहे. कारवाईचा अधिकार हा जिल्हाध्यक्षांचाच आहे.
                               – प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT