वाडा: खेड तालुक्यातील पश्चिम भागात भिवेगाव येथील मिनी देवकुंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या धबधब्यात डॉक्टरसह स्थानिक टूर गाइडचा मृत्यू झाला आहे. डॉ. सुबोध दिलीप करंडे (वय 27, रा. चाकण) आणि दिलीप वनघरे (वय 22) असे या धबधब्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेले डॉ. मंदार खोडके, डॉ. मंजिरी कोल्हे, डॉ. प्रियंका खराडे व डॉ. सुबोध करंडे हे सोमवारी (दि. 11) फिरण्यासाठी भिवेगाव येथील धबधब्यावर गेले होते. या वेळी त्यांनी स्थानिक माहीतगार म्हणून दिलीप वनघरे यांना सोबत घेतले होते. (Latest Pune News)
दुपारच्या वेळी हे सर्व डॉक्टर ट्रेक करत धबधब्याजवळ गेले. त्या धबधब्याशेजारील ओढ्याच्या पात्रात सुबोध पोहण्यासाठी गेले होते. या वेळी दिलीप वनघरे हा त्यांचे फोटो व व्हिडीओ काढत होता; मात्र, सुबोध हे बुडू लागले. त्यांनी हात वर केल्यावर त्यांना वाचवण्यासाठी दिलीपने पाण्यात उडी घेतली.
परंतु, दोघेही ओढ्याच्या पाण्यात बुडाले. त्यात या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य कळताच भिवेगावचे माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे व पोलिस पाटील संतोष वनघरे यांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले.