पुणे

चांदणी चौकातील प्रकल्पाची कामे वेगाने करा: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची सूचना

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करा, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली आहे. जिल्हाधिकारी देशमुख यांनी बुधवारी या प्रकल्पाची पाहणी केली व प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली, त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

सद्य:स्थितीत प्रकल्पाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. जून 2023 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवारस्त्यासाठी व इतर कामांसाठी दोन्ही बाजूंचे खडकाचे खोदकाम प्रगतीत आहे. सद्य:स्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा दिशेला पाच लेन व सातारा-मुंबईसाठी तीन लेन, अशा एकूण आठ लेन वाहतुकीसाठी उपलब्ध केल्या आहेत.

तसेच, सातार्‍याकडून एनडीएमार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त 2 लेन उपलब्ध आहेत. कोथरूड-वारजे-सातारा हा सेवारस्ता महामार्गाला जोडला असून, वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. उर्वरित काम पुढील 15 दिवसांत पूर्ण करण्यात येईल. एनडीए ते मुंबई या रॅम्प क्र. 5 चे काम प्रगतीवर असून, पुढील 10 दिवसांत ते पूर्ण होईल.

मुळशी-मुंबई वाहतूक सुरळीत होईल
मुळशी-मुंबई रॅम्पच्या उर्वरित भूसंपादनाच्या कामाच्या अनुषंगाने न्यायप्रविष्ट प्रकरणात 20 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने भूसंपादनाचे काम करण्यास परवानगी दिलेली आहे. पुणे महानगरपालिकेकडून जागेचा ताबा मिळाल्यानंतर 1 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित काम पुढील एक महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुळशीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती कदम यांनी दिली.

एनडीए सर्कल सुशोभीकरणास लवकरच प्रारंभ
कोथरूड-एनडीए रोड-मुळशी व एनडीए-मुंबईच्या दरम्यान असणार्‍या 'एनडीए सर्कल'चे सुशोभीकरण करण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी एनडीए, पुणे महानगरपालिका व एनएचएआय यांची संयुक्त बैठक घेऊन चौकाचे सुशोभीकरण करण्याविषयी सूचना केल्या होत्या. त्यानुसार दिशा कन्सल्टंटकडून बनविण्यात आलेल्या आराखड्यास (मॉडेल) एनडीएकडून नुकतीच सहमती मिळाली आहे. हे सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT