पुणे : गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी घेतलेल्या भूमिकेचे आता सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. कसबा पेठ मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्यासह गणेश मंडळांनी व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी डीजेमुक्त गणेशोत्सव झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी यावर्षी डीजे लावणार्या गणेश मंडळांना आर्थिक मदत न करण्याची भूमिका जाहीर केली आहे. या भूमिकेचे स्वागत करीत आमदार रासने यांनी पुण्याच्या गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. उत्सवातील पावित्र्य, संस्कृती आणि परंपरा जपणे हे आपले कर्तव्य आहे. गेली 40 वर्षे गणेश मंडळ कार्यकर्ता म्हणून मी या मूल्यांचा आग्रह धरला. अलीकडे डीजेसारख्या गोष्टींमुळे उत्सवाचे स्वरूप बिघडते, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे डीजेमुक्त गणेशोत्सवाचा बालन यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनीही बालन यांच्या घोषणेचे स्वागत करीत डीजे, लेझरमुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाहता सण उत्सव, महापुरुषांच्या जयंतीत डीजे नकोच, अशी भूमिका घेतली आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्याचा आदर्श संपूर्ण राज्यात तसेच देशात घेतला जातो. त्यामुळे डीजे आणि लेझर बंदीची सुरुवात पुण्यापासून व्हावी, असेही माने यांनी म्हटले आहे.
तुळशीबाग गणेश मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडीत यांनीही 130 वर्षांहून अधिक पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून, त्याचे पावित्र्य, संस्कृती आणि परंपरा जपणे हे आपल्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. डीजेवर अश्लील गाणी लावणार्या मंडळांना जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करणार नाही, या बालन यांच्या निर्णयाने गणेशोत्सवात डीजेवर लागणारी अश्लील, बिभत्स गाणी कमी होतील आणि मंगलमय वातावरणात गणेशोत्सव होईल, असे स्पष्ट करीत या निर्णयाचे स्वागत केले आहे.