पुणे, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीनिमित्त दिली जाणारी आनंदाचा शिधा म्हणजेच दिवाळी किट पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील लाभार्थ्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत मिळाले नाही. दुकानदारांकडे चारपैकी एक-दोन वस्तू आल्या. त्यामुळे आलेल्या वस्तू वितरित करायच्या कशा, असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांना पडला आहे.
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त रेशनच्या वस्तूंचे किट (पॅकेज) केवळ शंभर रुपयांत दिले जात आहे. शहरातील 3 लाख 30 हजार 917 कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. मात्र, किटचा पुरवठा करण्याचे शासनाचे नियोजन फसल्याने दिवाळी सुरू होऊनही अनेकांच्या घरात किट पोहचलेले नाही. सोमवारी किट मिळतील, अशी अपेक्षा लाभार्थ्यांना होती. मात्र, सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील अनेक दुकानांमध्ये शिधा किटमधील काही वस्तू पोहचल्या नाहीत, अशी माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांची संख्या मोठी असून, त्यामध्ये वास्तव्यास असलेली कुटुंबे ही स्वस्त धान्यावर अवलंबून असतात. साखर, चणाडाळ, रवा आणि पामतेल शंभर रुपयांत मिळणार असल्याने लाभार्थ्यांनी खुल्या बाजारातून या चार वस्तू खरेदी केल्या नाहीत. तर, दुसरीकडे या वस्तूंचे किट दिवाळी सुरू होऊनही मिळाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी फराळाविनाच साजरी होत असल्याचे दिसून येत आहे.