पुणे : दिवाळी म्हणजे गोडधोड पदार्थ आणि फराळाच्या पदार्थांची पर्वणी असते. चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळी अशा पदार्थांवर सहकुटुंब ताव मारला जातो. मात्र, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर जीवनशैलीजन्य आजार असणाऱ्यांना या आनंदावर विरजण सोडावे लागते. अशा वेळी घातक पदार्थांना आरोग्यदायी पर्याय वापरून दिवाळीचा आनंद द्विगुणित करता येऊ शकतो, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. (Latest Pune News)
फराळाच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने मैदा, साखर, तेल असे घटक पदार्थ प्रामुख्याने वापरले जातात. जीवनशैलीशी संबंधित आजाराचे रुग्ण तसेच डाएटवर असलेल्यांसाठी दिवाळीच्या दिवसांमध्ये अडचण होते. तब्येतीवर परिणाम होईल, या काळजीने फराळाच्या पदार्थांचा मोह टाळावा लागतो. फराळाच्या पदार्थांचा आस्वाद घेता यावा आणि आरोग्यावरही परिणाम होऊ नये, असे पर्याय वापरता येऊ शकतात.
आहारतज्ज्ञ मोनिका गोडबोले म्हणाल्या, ’गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी खजूर, खारीक पावडर हे पर्याय वापरता येऊ शकतात. फराळाचे पदार्थ करताना जास्तीत जास्त सुका मेवा, घरगुती तूप, ओटस यामुळे पदार्थांची आरोग्यदायी गुणवत्ता वाढते. मैद्याऐवजी रवा किंवा मिश्र डाळींचे पीठ वापरून करंजीसारखे पदार्थ तयार करता येतात. रव्याच्या लाडूंमध्ये बेसन, सत्तू, घरगुती तूप आणि नारळ, साखर वापरल्यास ते मधुमेहींसाठीही योग्य ठरतात.’
करंजी तळण्याऐवजी थोडे तूप लावून बेक किंवा एअरफायरमध्ये तयार करता येते.
पारंपरिक गोड आणि तिखट पदार्थांमध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करता येतात. तुपाऐवजी लाकडी घाण्याचे तेल वापरता येते.
ॲव्होकॅडो किंवा बदाम गोड पदार्थांमध्ये घालता येऊ शकतात.
बेक केलेल्या पदार्थांसाठी ऑलिव्ह ऑइल वापरता येते.
पूर्ण फॅट दूध किंवा क्रीमऐवजी लो-फॅट दूध किंवा साखर नसलेले बदाम दूध वापरल्यास खिरीसारखे पदार्थ हलके होतात. मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरणे हाही चांगला पर्याय आहे.
व्हेगन मिठाईसाठी दूध, खवा, कंडेन्स्ड मिल्कऐवजी बदाम किंवा सोया दूध, तसेच नारळ दूध आणि नट पेस्ट वापरल्यास गोडपणा आणि दर्जा दोन्ही टिकून राहतो.
गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी सुका मेवा वापरल्याने नैसर्गिक गोडवा वाढतो. पदार्थ तळण्यासाठी मायक्रोवेव्ह, ओव्हन किंवा एअरफ्रायर हे पर्याय वापरता येऊ शकतात. गोड पदार्थांमध्ये स्टिव्हियाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. दिवाळीच्या दिवसांमध्ये सुट्टीचा मूड असला तरी हलक्या व्यायामाला बेक देऊ नये. व्यायामात सातत्य ठेवल्याने कॅलरीचे गणित सांभाळता येऊ शकते.- सुशांत काळे, फिटनेसतज्ज्ञ